Tansa will be free from encroachment | तानसा जलवाहिनी होणार अतिक्रमणमुक्त
तानसा जलवाहिनी होणार अतिक्रमणमुक्त

मुंबई : सांताक्रुझ पूर्व येथील तानसा जलवाहिनीलगतचा परिसर अखेर अतिक्रमणमुक्त झाला आहे. गेले पाच दिवस सलग सुरू असलेल्या कारवाईत जलवाहिनीच्या आसपास असलेली ११० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे तानसा जलवाहिनीलगतचा पाचशे मीटर लांबीचा परिसर मोकळा झाला आहे. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात येत आहे.

जलवाहिनीलगतच परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. जलवाहिनीचा परिसर संवेदनशील असल्याने या ठिकाणी अतिक्रमण असणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालिकेमार्फत जलवाहिनीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. येथे असलेल्या अधिकृत, पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करून अनधिकृत झोपड्या हटविल्या जात आहेत. या कारवाईअंतर्गत एच पूर्व म्हणजेच सांताक्रुझ, विलेपार्ले या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे कडक पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.

तानसा जलवाहिनीलगतची अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई नुकतीच करण्यात आली. या कारवाईसाठी शंभर पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी त्या ठिकाणी दिवसरात्र तैनात ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर, महापालिकेचे शंभर कामगार-कर्मचारी-अधिकारीदेखील या कारवाईसाठी कार्यरत होते. या व्यतिरिक्त चार जेसीबी, पाच डम्पर आणि अतिक्रमण निर्मूलनविषयक आवश्यक साधनेदेखील या कारवाईत वापरण्यात आली, अशी माहिती एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे.

Web Title: Tansa will be free from encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.