पेट्रोल भरलेला टँकर कशेडी घाटात उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:31 IST2015-06-10T02:31:25+5:302015-06-10T02:31:25+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचविण्याच्या नादात एका अवघड वळणावर उलटल्याची घटना मंगळवार घडली.

पेट्रोल भरलेला टँकर कशेडी घाटात उलटला
पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचविण्याच्या नादात एका अवघड वळणावर उलटल्याची घटना मंगळवार सकाळी पावणेदहाच्या सुमारास धामणदेवी गावच्या हद्दीत घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकरमधील पेट्रोलची गळती सुरू झाल्याने पोलिसांनी सतर्कता दाखवून महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली.
टँकरचालक देविदास गीते (२३, रा. वडोली, ता. शेगाव, जि. अहमदनगर) हे आपल्या ताब्यातील टँकर घेऊन मुंबई ते खेड असा प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुरेश अंधारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक महाजन, एएसआय बाळासाहेब गोडगे, विश्राम गुंजाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक नातूनगर - विल्हेरे तुळशी खिंड महाड मार्गे वळवली. तसेच महाड एमआयडीसी येथून अग्निशमन बंबास पाचारण केले. खेड व चिपळूण येथून क्रेन बोलावून तब्बल तीन तासांनंतर क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलला. पेट्रोल गळती झालेल्या जागेवर माती टाकून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून वाहतूक अन्य मार्गाने वळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघातामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.