टँकर चालक-मालकांचा संप टळला

By Admin | Updated: February 22, 2015 01:58 IST2015-02-22T01:58:00+5:302015-02-22T01:58:00+5:30

राज्यातील ३० हजार टँकरच्या चालक, मालक संघटनांनी एकत्र येत रविवारपासून बेमुदत संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Tanker Driver and Owners Avoid | टँकर चालक-मालकांचा संप टळला

टँकर चालक-मालकांचा संप टळला

मुंबई : शासनाच्या विविध यंत्रणांकडून विनाकारण त्रास होत असल्याचे कारण देत राज्यातील ३० हजार टँकरच्या चालक, मालक संघटनांनी एकत्र येत रविवारपासून बेमुदत संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेअंती शनिवारी बैठक घेऊन विविध संघटनांनी १५ दिवसांसाठी तथाकथित संपाला स्थगिती दिल्याची माहिती आहे.
आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेचे संयोजक बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की, शुक्रवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते, वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, वैध मापन शास्त्र विभागाचे संजय पाण्डेय आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत चालक आणि मालकांसाठी काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सद्यस्थितीत कॅलिब्रेशनअभावी रस्त्यावर उभे असलेल्या २ हजार टँकरला लोडींगसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कॅलिब्रेशनअभावी हे २ हजार टँकर जागेवर उभे होते. परिणामी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत होते. मात्र टँकर कॅलिब्रेशनसाठी १५ दिवसांची वाढ देताना सरकारने कॅलिब्रेशन सेंटरलाही ३१ मार्चपर्यंत कॅलिब्रेशन करण्याची मुदतवाढ दिली आहे.
प्रशासनाने टँकर आणि लॉरी संबंधित नोंदणी किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क भरणा करण्यासाठी संबंधित मालकांना आरटीओ कार्यालयात येण्याची सक्ती केली होती. त्यातही शासनाने शिथिलता आणण्याचा निर्णय बैठकीदरम्यान घेतला.
यापुढे संबंधित वाहनाच्या मालकांच्या प्रतिनिधीलाही कर भरण्याची परवानगी दिली आहे. चालक आणि मालकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयांचे संघटनेने शनिवारी नेरुळ येथे झालेल्या बैठकीत स्वागत केले आहे. शिवाय १५ दिवसांत निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही, तर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे संघटनेने सांगितले.

Web Title: Tanker Driver and Owners Avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.