‘तालीम हॉल’ हीच सुलभातार्इंना श्रद्धांजली!

By Admin | Updated: June 15, 2016 02:33 IST2016-06-15T02:33:03+5:302016-06-15T02:33:03+5:30

प्रायोगिक आणि बालरंगभूमीवर नाटकांचे प्रयोग होण्याआधी त्यांच्या होणाऱ्या तालमी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यासाठी एखादा कायमस्वरूपी ‘तालीम हॉल’ मिळावा म्हणून प्रायोगिक व बालरंगभूमीला

Taleem Hall is a tribute to the recipients! | ‘तालीम हॉल’ हीच सुलभातार्इंना श्रद्धांजली!

‘तालीम हॉल’ हीच सुलभातार्इंना श्रद्धांजली!

- राज चिंचणकर, मुंबई

प्रायोगिक आणि बालरंगभूमीवर नाटकांचे प्रयोग होण्याआधी त्यांच्या होणाऱ्या तालमी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यासाठी एखादा कायमस्वरूपी ‘तालीम हॉल’ मिळावा म्हणून प्रायोगिक व बालरंगभूमीला सर्वार्थाने वाहून घेतलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचेही अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. ‘आविष्कार’ची छबिलदास चळवळ जोरात असताना छबिलदास शाळा म्हणजे त्यांच्यासाठी मोठाच आधार होता. कालांतराने ‘आविष्कार’चे बस्तान माहीमच्या शाळेत हलवले गेले; पण तेथेही सुलभातार्इंच्या मनावर ‘तालीम हॉल’ची तलवार कायमच टांगती राहिली. आता निदान त्यांच्या पश्चात तरी प्रायोगिक व बालरंगभूमीसाठी ‘तालीम हॉल’ मिळाल्यास ती सुलभातार्इंना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर नाट्यसृष्टीतूनच उमटला. ‘आविष्कार’ नाट्यसंस्था आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांनी देशपांडे यांच्या स्मृती सभेत ‘तालीम हॉल’चा आवाज बुलंद झाला. मोहन जोशी, अरुण काकडे, रोहिणी हट्टंगडी, चित्रा पालेकर, सुहास जोशी, विजय केंकरे,नसिरुद्दीन शहा, रत्ना पाठक, चंद्रकांत कुलकर्णी, लता नार्वेकर आदींच्या साक्षीने ही मागणी पुन्हा एकदा पटावर आली.

सुलभातार्इंकडून बरेच काही शिकलो आणि या क्षेत्रात मी समृद्ध होत गेलो. प्रायोगिक व बालरंगभूमी हा त्यांचा श्वास होता. निदान आता तरी त्यासाठी एखादा कायमस्वरूपी तालीम हॉल मिळायला हवा. तसे झाल्यास तीच सुलभाताईंना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.
- विजय केंकरे, दिग्दर्शक

चंद्रशाला’च्या माध्यमातून सुलभातार्इंशी माझा परिचय झाला. पुढे चंद्रशालाचा लोगो पण मी केला. उत्तम कलावंत तर त्या होत्याच; परंतु एक व्यक्ती म्हणूनही त्या मनात ठसल्या. सुलभातार्इंच्या नावाने एखादा प्रायोगिक रंगमंच किंवा निदान तालमीची जागा तरी व्हायला हवी.
- रघुवीर कुल, दिग्दर्शक

‘सुलभाने स्वत:ला कधीच ग्रेट वगैरे मानले नाही. ती कायम साधी राहिली. आता ‘चंद्रशाला’ची एक पिढी म्हातारी होत असताना, नवीन मुले घडवण्यासाठी ‘चंद्रशाला’ पुन्हा सुरू व्हायला हवी.
- सुहास जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री

छबिलदास मुलींच्या शाळेत बाई आम्हाला हिंदी शिकवायच्या. आमच्यासाठी त्या नेहमीच ‘कामेरकर बाई’ होत्या आणि त्याच आडनावाने आम्ही त्यांना हाक मारत होतो. आम्ही शाळेच्या स्नेहसंमेलनात नाटके करत असू आणि बाई आमच्याकडून ही नाटके उत्साहाने बसवून घ्यायच्या.
- विद्या जोशी, सुलभातार्इंची विद्यार्थिनी

माझ्या संस्कारक्षम वयात सुलभातार्इंच्या बेणारेबार्इंचा संस्कार मनात खोल रुजला आहे. माझ्या नाटकाच्या प्रयोगानंतर त्यांनी माझा हात हातात घेतलेला त्यांचा तो स्पर्श आजही ताजा आहे. तो स्पर्श मला बरेच काही सांगून गेला.
- सुषमा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री

‘चंद्रशाला’च्या ‘दुर्गा झाली गौरी’मधली पहिली गौरी साकारायची संधी मला मिळाली आणि मी सुलभातार्इंकडून खूप काही शिकत गेले. त्यांनीच मला खऱ्या अर्थाने दुर्गा बनवले.
- संध्या पुरेचा, शास्त्रीय नृत्यांगना

Web Title: Taleem Hall is a tribute to the recipients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.