Join us  

घर घेताय? क्यू आर कोड स्कँन करा आणि एका क्लिकवर प्रकल्पाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 7:39 AM

महारेरा आता नवीन नोंदणीकृत गृह प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड देणार आहे.

मुंबई :

महारेरा आता नवीन नोंदणीकृत गृह प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड देणार आहे. महारेराकडून देण्यात येणारा हा क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाची मूलभूत माहिती उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे जुन्या नोंदणीकृत प्रकल्पांनाही आता टप्प्याटप्प्याने क्यूआर कोड दिला जाणार असून, भविष्यात सध्या नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकल्पांना ही सुविधा लागू होईल.

नुकतेच पुण्यातील एका विकासकाला क्यूआर कोडसह नवीन नोंदणीचे प्रमाणपत्र महारेराने जारी केले आहे. रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकाने कुठल्या कुठल्या बाबींची काळजी घ्यायची, याचा पुनरुच्चार या नोंदणी प्रमाणपत्रात दिलेला आहे.महारेराने मे २०१७ ला स्थापना झाल्यापासून ते मार्च २०२२ पर्यंत नोंदविलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे, असे सांगण्यात आले.प्रकल्पांचे सूक्ष्म संनियंत्रण    स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या घर खरेदीदार आणि तत्सम गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.     त्यासाठीच महारेराने देशातील कुठल्याही प्राधिकरणात अस्तित्वात नसलेली प्रकल्प संनियंत्रण यंत्रणा कार्यरत केली आहे. या यंत्रणेच्या मदतीने महारेराने नोंदणीकृत प्रकल्पांचे सूक्ष्म संनियंत्रण सुरू केले आहे.

    रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर ३ महिन्याला आणि ६ महिन्याला काही प्राथमिक माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते.    प्रपत्र ५ अत्यंत महत्त्वाचे आहे. हे दरवर्षी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्य:स्थिती आणि एकूण खर्च उपलब्ध होतात.

एका क्लिकवर काय मिळणार ?घर खरेदीदार किंवा गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध माहिती हवी असते. प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदविला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का. प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखडय़ात काही बदल केला का. प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे उपलब्ध होणार.

विकासकांना विविध त्रुटींच्या पूर्ततेसाठी पुरेसा वेळही देण्यात येत आहे. वारंवार पुरेशी संधी देऊनही ज्यांच्याकडून सहकार्य मिळणार नाही, त्यांच्यावर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.                - महारेरा

टॅग्स :महारेरा कायदा 2017