Join us  

'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 5:25 PM

WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे

मुंबई - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतकी झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण, या संकटात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) याचे कौतुक केलं आहे. WHOचं हे कौतुक म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देणारे आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मात्र, धारावीच्या कौतुकानंतर तेथील श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.  

धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.  WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात. मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला.''

त्यानंतर, भाजपा नेते नितेश राणे यांनी हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी ट्विट केलं की,''राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.'', असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचं म्हटलं होतं. मात्र, भाजपा नेत्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. तसेच, धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याची टीकाही शेवाळे यांनी केली.

दरम्यान, ''आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं,'' या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :धारावीशिवसेनाभाजपाराहुल शेवाळे