Join us  

रिक्षा, टॅक्सीत बसण्यापूर्वी नंबर प्लेटचा फोटो काढा; दिवाकर रावते यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 1:38 AM

सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास सुरू करण्यापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नंबर प्लेटचा फोटो काढावा आणि नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तींकडे पाठवून ठेवावे, असे आवाहनही परिवहनमंत्र्यांनी केले.

मुंबई : जादा रिक्षाभाडे मागत तरुणावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच दणका दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपच्या आधारे मनसैनिकांनी ‘त्या’ रिक्षाचालकाला शोधून काढत पोलिसांच्या हवाली केले. मनसेच्या या कारवाईनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘त्या’ रिक्षाचालकाचा परवाना रद्द करून कारवाईचे आदेश दिले. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास सुरू करण्यापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नंबर प्लेटचा फोटो काढावा आणि नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तींकडे पाठवून ठेवावे, असे आवाहनही परिवहनमंत्र्यांनी केले.मुजोर रिक्षाचालकाने एका तरुण प्रवाशाकडे जादा भाडे मागत मारहाण केल्याचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील होता. एका तरुणीने हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओत रिक्षाचालक तरुणावर हात उचलत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वांद्रे येथील मनसे कार्यकर्त्यांनी त्या मुजोर रिक्षाचालकाला शोधून काढत त्याला मनसे स्टाईल इंगा दाखविला. त्यानंतर त्याला बीकेसी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.रिक्षाचालकाला चोपवीस रुपये शेअरिंग असताना प्रवाशाकडे ३० रुपये मागत रिक्षाचालकाने दमदाटी केली होती. प्रवाशावर हातही उगारला. या व्हिडीओतील रिक्षाच्या नंबरवरून वांद्रे येथील मनसे कार्यकर्ता अखिल चित्रे आणि अन्य कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला वांद्रे पूर्वेतील ज्ञानेश्वर नगर येथून शोधून त्याला चांगलाच दणका दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे़

टॅग्स :दिवाकर रावतेमनसेऑटो रिक्षाटॅक्सी