नोट उचललीत, कचराही उचला..!
By Admin | Updated: April 5, 2015 00:59 IST2015-04-05T00:59:21+5:302015-04-05T00:59:21+5:30
शंभर रुपयांच्या बनावट नोटा रस्त्यावर भिरकावून मुंबईच्या आयआयटीयन्सनी आगळ्या पद्धतीने स्वच्छतेचा संदेश सर्वत्र दिला.

नोट उचललीत, कचराही उचला..!
मुंबई : शंभर रुपयांच्या बनावट नोटा रस्त्यावर भिरकावून मुंबईच्या आयआयटीयन्सनी आगळ्या पद्धतीने स्वच्छतेचा संदेश सर्वत्र दिला. १ एप्रिलला या नोटा उचलणाऱ्यांचा एप्रिल फूल तर झालाच, मात्र नोट उघडल्यावर त्यांना स्वच्छतेचा धडाही मिळाला. ‘इट टेक्स इक्वल एफर्ट्स टू पीक -अप अ पीस आॅफ गार्बेज’(रस्त्यावर पडलेला कचरा उचलायलाही इतकेच श्रम लागतील़) हा संदेश या नोटांवर लिहिण्यात आला होता.
आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो चमूतल्या मनाली वाघमारे, निशित देढीया यांना ही थट्टेतून जनजागृतीची भन्नाट कल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीतल्या विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्या कामाला लागल्या. शंभरच्या नोटेची कलर झेरॉक्स करण्यात आली. त्यावर संदेश चिकटविण्यात आला. नोटा दुमडून अत्यंत चपखलपणे आयआयटी कॅम्पसमध्ये भिरकावण्यात आल्या. कॅम्पसमध्ये ये-जा करणाऱ्या अनेकांनी या नोटा खऱ्या समजून उचलल्या तेव्हा त्यांचा एप्रिल फूल झाला. सोबत त्यांना स्वच्छतेचा संदेशही मिळाला.
या प्रयोगाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला, असे या प्रयोगात सहभागी झालेला ध्रुव पटेल सांगत होता. आम्ही कॅम्पसमधल्या अॅकॅडमिक इमारतींजवळ या नोटा भिरकावून गंमत पाहिली. या इमारतींमध्ये ये-जा करणाऱ्यांपैकी अनेकांनी नोट खरी समजून उचलली. मात्र एप्रिल फूल झाल्याचे लक्षात येताच, आतला संदेश वाचताच त्यांनी या प्रयोगाला दाद दिलीच; पण यापुढे इथे तिथे कचरा न करण्याचे, रस्त्यात कचरा दिसलाच तर तो उचलण्याचे कबूल केले. काहींनी तर नोट उचलून थेट खिशात कोंबली. ती उघडून पाहण्याची तसदीही घेतली नाही, असे पटेल हसत हसत सांगत होता.
आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा हे भान कोणालाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानानंतर तरी किमान ही जाणीव व्हायला हवी होती. आम्ही हा संदेश थोड्या वेगळ्या मार्गाने, थट्टा-मस्करीतून देण्याचे ठरवले, असे स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित झालेली मनाली वाघमारे सांगत होती. (प्रतिनिधी)
इतक्यावरच न थांबता या आयआयटीयन्सनी नोटा उचलणाऱ्या, ती उघडून पाहिल्यानंतर स्तंभित झालेल्या, नोट तशीच्या तशी खिशात कोंबणाऱ्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्याची एक क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर अपलोड केली. सध्या देशभरात या क्लिपची चर्चा आहे.