Join us  

तुमच्या घोषणाबाजीचा आढावा घ्या, अशोक चव्हाणांकडून मुख्यमंत्री टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 9:28 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून काही घोषणा केल्या. मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करत असतात. परंतु,

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून काही घोषणा केल्या. मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करत असतात. परंतु, आपल्याच घोषणांची आपण अंमलबजावणी करतो का? याचा वर्षातून एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

वरळी येथील एनएससीए सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या महाअधिवेशनात अशोक चव्हाण बोलत होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फडणवीस  यांनी ओबीसींच्या नोकरीतील अनुषेश भरुन काढण्यासोबतच विविध घोषणा केल्या होता. याचा संदर्भ घेऊन चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणांचाच एकदा आढावा घ्यावा. तसेच महाअधिवेशनाच्या आयोजकांनाही माझी एक विनंती आहे. आज या व्यासपीठावरुन ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा त्यांनी पुढच्या अधिवेशनात घ्यावा. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे, सरकारने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावू नयेत, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सामाजिक संघर्ष निर्माण होतो की काय अशी चिंता आज अनेकांना वाटते. त्या त्या वेळच्या सरकारने आरक्षणे दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी होते की नाही हा खरा प्रश्न आहे. देशात सामाजिक संघर्षाऐवजी सामाजिक एकोपा निर्माण झाला पाहिजे. देशात ज्या समाजाला आरक्षण दिले आणि जेवढे दिले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या राजकारण्यांना संधी मिळाली त्यांचे भले झाले. अनेकजण आमदार, खासदार, मंत्री झाले, पण समाज आहे तिथेच आहे, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :अशोक चव्हाणदेवेंद्र फडणवीसअन्य मागासवर्गीय जाती