Join us  

शिंगावर घेणे हा आमचा खाक्या! लोकमतच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा 'ठाकरी बाणा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 6:04 AM

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : सोबत आले तर ठीक नाहीतर घेतले शिंगावर हा आमचा खाक्या आहे. सध्या युतीबद्दल बोलणाऱ्यांबद्दल मैदानात उतरल्यावर बोलू, असे उदगार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी काढले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. ठाकरे यांचे हे उद्गार राजकीय विरोधकांच्या रोखाने की मित्रपक्षाला उद्देशून अशी चर्चा नंतर उपस्थितांमध्ये सुरु झाली.

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ या पुरस्कार सोहळ््यात उद्धव ठाकरे यांना ‘पॉवर आयकॉन आॅफ दी इयर’ हा पुरस्कार ख्यातनाम समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, की गेले दोन दिवस तोंड बंद आहे. परवानंतर काही सुचत नाही. आता मी मुख्यमंत्र्यांना विचारतो की, हाऊ इज जोश! राजकारणावर बोलायला पुढचा महिना आहे. मात्र सोबत आला तर ठीक, नाहीतर शिंगावर घेतले शिंगावर हा आमचा खाक्या आहे. आजच्या पुरस्कार सोहळ््यालाही पुलवामा हल्ल्याची झालर आहे. आपण पाकड्यांचे कंबरडे कसे मोडतो त्याची देश वाट पाहत आहे. आपण साºयांनी एकवटत पाकड्यांच्या पेकाटात अशी लाथ घाला की, पुन्हा त्यांची हल्ला करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे.

मी हा पुरस्कार माझ्या शिवसैनिकांच्यावतीने स्वीकारत असून अडचणींच्या वेळी ते माझ्यासोबत उभे राहिले नसते, तर हा पुरस्कार मला प्राप्त झाला नसता. त्यामुळे हा पॉवर आयकॉन पुरस्कार शिवसैनिकांच्या चरणी अर्पण करतो, अशी भावनाही ठाकरे यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर बसलेले सारे घराणेशाहीचे शिलेदार आहेत. आप्पासाहेब यांना नानासाहेबांचा वारसा लाभला आहे. मलाही राजकीय वारसा लाभला आहे आणि विजयबाबू यांनाही राजकीय वारसा लाभला आहे, असे सांगत ठाकरे म्हणाले, यापूर्वी नानासाहेबांबरोबर एक-दोन कार्यक्रम झाले आहेत. धर्माधिकारी म्हटले की एकटे नसतात. नजर टाकावी तेथपर्यंत माणसेच माणसे दिसतात. ओसाड निर्जीव माळरानात जीव भरणारे हे लोक आहेत. नानासाहेबांच्या समोर बसलेली लाखो माणसे बसली होती. त्यांची मोजदाद शक्य नव्हती. त्यावेळी नानासाहेब म्हणाले, की मी गेली ६० ते ६२ वर्षे यांच्या घराघरात जात आहे. नानासाहेबांचे ते वाक्य माझ्या ह्रदयात घर करुन बसले आहे. आम्ही घराघरात मते मागायला जातो. मात्र धर्माधिकारी घरे जिवंत करायला आणि घरपण टिकवायला जातात. त्यामुळे आप्पासाहेबांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. आपल्या या आशीर्वादामुळे यशवंत झाल्याखेरीज राहणार नाही, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

येथे पुरस्कार स्वीकारणाऱ्या लोकांचे कार्य पाहिल्यावर आपण किती छोटे आहोत ते मला जाणवले, असे नमूद करुन ठाकरे म्हणाले, की त्यांच्या मागे कोण उभे राहते? मघाशी ग्रामीण भागातून आलेल्या त्या महिलांनी पाणी मागितले. मात्र कुणाहीकरिता त्यांचे काम थांबत नाही. या माणसांमुळे महाराष्ट्र उभा राहिला. महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारा आहे. वृत्तपत्र चालवणे सोपे नाही. वृत्तपत्र हा लोकशाहीचा चवथा स्तंभ असून समाजाला मार्गदर्शन करणे हेही वृत्तपत्राचे काम आहे, असे सांगत ठाकरे यांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस