Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 09:34 IST

२००६च्या आधारे देण्यात आला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर शनिवारी ईद ऊल अजहा (बकरी ईद) ची नमाज अदा करण्यास परवानगी देण्याबाबत राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सचिवांनी व महापालिकेच्या परिमंडळ १ चे उपायुक्त यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची सामूहिक नमाज अदा करण्यास गावदेवी पोलिसांनी परवानगी नाकारल्याविरोधात उमर अब्दुल जब्बार गोपलानी यांनी याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झाली.

२००६ च्या आधारे निकाल

सार्वजनिक मैदानावर अशा प्रकारे सामूहिक नमाजच्या धार्मिक कृत्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची व कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याच्या भीतीमुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, गेल्या सुमारे ५० वर्षांपासून या ठिकाणी ईदची नमाज अदा केली जाते व त्यामुळे कोणताही धार्मिक तणाव किंवा कायदा सुव्यस्थेची स्थिती उद्भवलेली नाही, याकडे याचिकादारांचे वकिल बुऱ्हाण बुखारी व ॲड. हुसेन शेख यांनी लक्ष वेधले. है मैदान संरक्षित स्मारक असल्याने त्याच्या वापराबाबत सक्षम अधिकारी असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांमार्फत परवानगी घ्यावी, या उच्च न्यायालयाच्या २००६ मधील निर्णयाचा आधार घेत खंडपीठाने त्याच धर्तीवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश दिले.

टॅग्स :मुस्लीममुंबई महानगरपालिकान्यायालय