कामासंदर्भात ठेकेदार व प्राधिकरणावर कारवाई करा
By Admin | Updated: May 18, 2015 03:51 IST2015-05-18T03:51:59+5:302015-05-18T03:51:59+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने चौक - कर्जत राज्यमार्गाच्या चौपदरीकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून

कामासंदर्भात ठेकेदार व प्राधिकरणावर कारवाई करा
कर्जत : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने चौक - कर्जत राज्यमार्गाच्या चौपदरीकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रयत्नशील होतो. रस्त्याचे चौपदरीकरण म्हणूनच मंजूर असताना ते न करणाऱ्या ठेकेदार आणि एमएमआयडीए संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन शासनाने चौपदरी रस्ता मंजूर केला असताना वर्षभर रस्त्याचे काम उशिरा सुरूकरणाऱ्या आणि ते निविदेप्रमाणे न करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणीही आ. लाड पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये करणार आहेत.
नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे रस्ते फ्री-वे करण्याचा शासनाचा प्रयत्न असताना त्यातील कल्याण काटई नाका ते कर्जत आणि पुढे खोपोली असा राज्यमार्ग चौपदरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात कर्जतपासून मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता म्हणून कर्जत - चौक हा नऊ किलोमीटरचा रस्ता देखील चौपदरी करण्याचा निर्णय या रस्त्यावरील वाढती रहदारी आणि शनिवार - रविवारी होणारी सेकंड होम व फार्म हाऊसकडे जाणाऱ्या-येणाऱ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे घेण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने आपल्या मर्जीप्रमाणे कामे केली. रस्त्याच्या नऊ किलोमीटरचा भाग पाहिला असता काही ठिकाणी डांबरी तर काही ठिकाणी आरसीसी सिमेंटचा वापर करून रस्ता तयार केला आहे. कुठेही रस्ता चौपदरी न केल्यामुळे आताचा आणि पूर्वीचा रस्ता यामध्ये फारसा फरक पडला नाही.
रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर असताना ठेकेदार कंपनीचा कोणी अभियंता जर एमएमआरडीएच्या निर्देशाप्रमाणे रस्त्याचे काम केले आहे, असे म्हणत असेल तर त्यांना पाठीशी घालणारी प्राधिकरणाची यंत्रणा यांची देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सुरेश लाड यांनी दिली आहे. (वार्ताहर)