वाकण-पाली मार्ग झाला टकाटक
By Admin | Updated: May 7, 2015 23:32 IST2015-05-07T23:32:56+5:302015-05-07T23:32:56+5:30
वाकण-पाली मार्ग गेली कित्येक वर्षे खड्डेमय अवस्थेत होता. ठेकेदाराकडून केवळ माती आणि खडीने हे खड्डे भरले जायचे. मात्र यंदा पाली सार्वजनिक

वाकण-पाली मार्ग झाला टकाटक
पाली : वाकण-पाली मार्ग गेली कित्येक वर्षे खड्डेमय अवस्थेत होता. ठेकेदाराकडून केवळ माती आणि खडीने हे खड्डे भरले जायचे. मात्र यंदा पाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप चव्हाण यांनी जातीने लक्ष देऊन वाकण-पाली मार्गाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस करून घेतले. याशिवाय साइडपट्टीवरती मातीभराव, वळणावरती रिफ्लेक्टर बसवून वाकण-पाली मार्ग वाहतुकीसाठी टकाटक केल्याने प्रवासी व वाहनचालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
रस्ता उत्तम झाला ही जरी जमेची बाजू असली तरी खड्डेमुक्त रस्त्यावरून वाहने सुसाट जात असल्याने गेल्या दोन महिन्यांत येथील अपघाताचे प्रमाण मात्र खूप वाढले आहे. एप्रिल महिन्यातच या मार्गावरती जंगली पीर येथे पालीतील दोन तरुणांना मोटारसायकल अपघातात जीव गमवावा लागला, तर म्हसळा तहसीलदार यांच्या गाडीचा अपघात, कोळशाने भरलेला ट्रक नदीत कोसळल्याने अपघात, राबगावजवळील ट्रक-मोटारसायकल अपघात, बलापजवळील आॅडी कार व मोटारसायकल अपघात असे अनेक अपघात या मार्गावर झाल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या मार्गावर वेडीवाकडी वळणे असल्याने नव्याने येणाऱ्या वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
(वार्ताहर)