Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या खिशाला लाल मिरचीचा ‘तडका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 07:59 IST

मसाला महागला; तीन महिन्यांत दर वाढले २० ते २५ टक्क्यांनी

सुहास शेलार

मुंबई : स्वयंपाक अधिक रुचकर होण्यासाठी त्यावर लाल मिरचीचा तडका दिला जातो. पदार्थ चमचमीत करण्यासाठी त्यात लाल मिरची पावडर जरा जास्तच टाकली जाते. पण, आता या लाल मिरचीने सर्वसामान्य ग्राहकांच्याच खिशालाच तडका दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेडगी, संकेश्वरी, तेजा, गुटुंर आणि गावठी मिरचीच्या दरात जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मसालाही महागला आहे.

मिरची हा प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक. भाजणीच्या मसाल्यात मिरचीचे प्रमाण हे ६० टक्क्यांहून अधिक, तर मिरचीपूड तयार करताना हे प्रमाण सुमारे ९५ टक्के इतके असते. त्यामुळे मिरची महागली की आपोआप मसालेही महागतात. बाजारात मिळणाऱ्या तयार मसाल्यांसह घरात बनविल्या जाणाऱ्या मसाल्यांसाठीही हेच सूत्र लागू पडते.

कारण काय?nपाऊस लांबल्याने त्याचा मिरचीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा मिरची उशिराने बाजारात दाखल झाली. अवकाळी पावसामुळे दक्षिणेत शेतीचे मोठे नुकसान झाल्यानेही आवक काही प्रमाणात कमी झाली.nदुसरे म्हणजे बहुतांश मसाले कारखान्यांकडून दुय्यम प्रतीच्या मिरच्यांची मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात त्यांचे दर वधारले आहेत.nउच्च प्रतीच्या मिरच्यांच्या तुलनेत एकरामागे दुय्यम मिरच्यांचे उत्पादन तिप्पट अधिक मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे आपला कल वाढविला आहे.nपरिणामी, उत्पादन कमी झाल्याने उच्च प्रतीच्या मिरच्यांच्या दरात वाढ, तर मसाले उत्पादकांकडून मागणी वाढल्याने दुय्यम प्रतीच्या मिरच्यांची किंमत वाढली आहे. 

आवक कमी झाल्याचा परिणामबड्या कारखान्यांकडून मागणी वाढल्याने कर्नाटक, केरळ किंवा अन्य राज्यांतील शेतकऱ्यांनी दुय्यम दर्जाच्या मिरची लागवडीकडे माेर्चा वळवला. परिणामी, उच्च प्रतीच्या मिरच्यांची लागवड कमी झाल्याने बाजारात त्यांची आवकही कमी झाली. त्यामुळे किमती वाढल्याचे दिसून येते.- संकेत खामकर, अध्यक्ष, लालबाग न्यू मार्केट व्यापारी असोसिएशन.

लालबागमधील मसाला बाजारात - लवंगी २८०, तर गावठी मिरची २४० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.