Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा वाद थांबताना दिसत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कुणाल कामराने ठाणे की रिक्षा हे गाणं बॉलिवूड गाण्याच्या चालीत म्हटलं होतं. याप्रकरणी सरकारने कारवाईचा इशारा दिलाय. तर मुंबई पोलिसांनी कामराला समन्स बजावलं आहे. दुसरीकडे आता टी-सिरीजनेही कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. गाण्याच्या कॉपीराईटच्या मुद्द्यावरुन नोटीस आल्यानंतर कुणाल कामरानेही टी-सिरीजला प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाच्या तरी हातातल्या बाहुल्या बनणं थांबवा असं कामराने म्हटलं.
कॉमेडियन कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. कामराचं गाणं व्हायरल होताच शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी द हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली होती. याप्रकरणी कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे, आता कुणाल कामराने एक्स पोस्टवरुन टी-सीरिजने आपल्याला न्यू इंडिया: कॉमेडी स्पेशल या एपिसोडसाठी कॉपीराईट नोटीस पाठवल्याचे सांगितले. 'दिल तो पागल है' चित्रपटातील 'भोली सी सूरत आँखों में मस्ती' या गाण्याच्या चालीच्या वापरावरुन टी-सीरीजने कॉपीराईटची नोटीस दिली.
"हॅलो टी-सिरीज, कोणाच्या तरी हातातल्या बाहुल्या बनणं थांबवा. विडंबन आणि व्यंगचित्र कायदेशीररित्या वाजवी वापराच्या अंतर्गत येतात. मी गाण्याचे बोल किंवा ओरिजनल इन्स्ट्रूमेंटल वापरलेले नाही. तुम्ही हा व्हिडिओ हटवल्यास, प्रत्येक कव्हर गाणे/डान्स व्हिडिओ हटवला जाऊ शकतो. निर्मात्यांनो, कृपया नोंद घ्या. भारतातील प्रत्येक मक्तेदारी माफियापेक्षा कमी नाही. त्यामुळे हे काढून टाकण्यापूर्वी कृपया पहा/डाउनलोड करा. तुमच्या माहितीसाठी T-Series, मी तामिळनाडूमध्ये राहतो," असं कुणाल कामराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावरुन वाद सुरु असतानाच कुणाल कामराने बुधवारी एक नवीन गाणे रिलीज केले आहे. ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधण्यात आला आणि भाजपवर हुकूमशाहीचा आरोप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कामराने व्हिडीओ जारी केला.