वांद्र्यात तलवार हल्ला; ७ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST2021-07-28T04:06:08+5:302021-07-28T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे परिसरातही सोमवारी रात्री जे.जे. कॉलनीतील स्थानिकांवर दहा जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केला. ...

वांद्र्यात तलवार हल्ला; ७ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे परिसरातही सोमवारी रात्री जे.जे. कॉलनीतील स्थानिकांवर दहा जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केला. त्यात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वांद्रे येथील जे.जे. कॉलनीत राहणारे स्थानिक जेवण उरकून घराबाहेर गप्पा मारत उभे होते. त्याच दरम्यान आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले. त्यांनी तलवारीने या सर्वांवर हल्ला केला आणि पसार झाले. बेसावध असताना हा हल्ला झाल्याने सात जणांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सर्व हल्लेखोर हे अनोळखी होते. त्यामुळे या जीवघेण्या तलवार हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवणी तसेच बोरीवलीतही अशाच प्रकारे तलवार हल्ले झाल्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांत उघड झाली आहेत. ज्यात जखमींमध्ये एक वकील आणि त्याच्या सहकाऱ्याचादेखील समावेश आहे.