स्वाइन फ्लूचे निदान लवकर होणे शक्य
By Admin | Updated: November 8, 2016 02:52 IST2016-11-08T02:52:08+5:302016-11-08T02:52:08+5:30
अन्य साथीच्या तापांच्या लक्षणाप्रमाणे ‘स्वाइन फ्लू’चे चटकन निदान होत नाही. या तापाचे निदान होईपर्यंत श्वसनाचे विकार जडून श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.

स्वाइन फ्लूचे निदान लवकर होणे शक्य
मुंबई : अन्य साथीच्या तापांच्या लक्षणाप्रमाणे ‘स्वाइन फ्लू’चे चटकन निदान होत नाही. या तापाचे निदान होईपर्यंत श्वसनाचे विकार जडून श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे या आजाराचे निदान लवकर व्हावे, यासाठी ‘जैविक मार्कर्स’चा अहवाल मुंबई विद्यापीठ आणि जे. जे. रुग्णालय समूहाकडून सादर करण्यात आला आहे. याद्वारे स्वाइन फ्लूचे निदान लवकर होणे शक्य होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स (सीईबीएस) आणि सर जे. जे. ग्रुप्स आॅफ रुग्णालयाच्या संशोधकांनी एकत्रितरीत्या ‘जैविक मार्कर्स’ हा अहवाल बनविला आहे. या अहवालातून बनविण्यात येणाऱ्या ‘स्वाइन फ्यू’ या मापक यंत्राची माहिती देण्यात आली आहे. यामुळे स्वाइन फ्लूचे निदान लवकर होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. गेले एक ते दीड वर्ष यासंदर्भातील संशोधन सुरू होते. यासाठी २०० श्वसनग्रस्त रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये इन्फ्युएन्झाचे घटक तपासण्यासाठी रिअल टाइम पीसीआर चाचणी करण्यात आली. शिवाय १० निरोगी माणसांचे नमुने वापरण्यात आले. यातून श्वसनग्रस्त रुग्णांमध्ये ६ प्रोटिन्स अधिक आढळून आली.
‘श्वसन प्रोटिओम प्रोफाईल’वरील हा पहिलाच अहवाल आहे. या अहवालाच्या माध्यमातून प्रेंगन्सी किट तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या किट प्रमाणेच स्वाइन फ्लू तपासणी किट बनविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे किट बाजारात आणणार असल्याचे डॉ. अविनाश काळे यांनी सांगितले. या संशोधन चमूत सर जे. जे. ग्रुप आॅफ रुग्णालयचे प्रा. डॉ. अभय चौधरी, विद्यापीठाच्या अणुऊर्जा सीईबीएसमधील डॉ. अविनाश काळे, राहुल चव्हाण, हाफकिन संस्थेचे डॉ. संदीपन यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)