‘घुमानवारी’च्या रेल्वे फुल्ल!

By Admin | Updated: March 4, 2015 02:18 IST2015-03-04T02:18:56+5:302015-03-04T02:18:56+5:30

पंजाबमधील घुमान येथे आयोजित केलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण संमेलनाला एक महिना असूनही आताच पूर्ण झाले आहे.

'Swimming' train full! | ‘घुमानवारी’च्या रेल्वे फुल्ल!

‘घुमानवारी’च्या रेल्वे फुल्ल!

मुंबई : पंजाबमधील घुमान येथे आयोजित केलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण संमेलनाला एक महिना असूनही आताच पूर्ण झाले आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांमधून सुमारे २ हजार ६२० मराठी साहित्यप्रेमींसह अन्य मार्गानेही घुमानकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले.
यंदा प्रथमच ‘घुमान संमेलन प्रश्नमंजूषा स्पर्धे’चेही आयोजन करण्यात येत असून, त्यातील पाच विजेत्यांना घुमानला संमेलनासाठी मोफत नेण्यात येणार आहे. लॉटरी पद्धतीने काढण्यात येणाऱ्या या पाच जणांबरोबरच आणखी १०० जणांना २ हजार रुपये किमतीची वाङ्मयीन पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचेही देसडला यांनी जाहीर केले. या वेळी ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि घुमान संमेलन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजक सुधीर शिंदे उपस्थित होते.
घुमान साहित्य संमेलनाला केवळ महिना उरल्यामुळे तिथले स्थानिक पंजाबी बांधव अतिशय उल्लसित झाले असून, संमेलनाची पूर्वतयारीही तितकीच उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलनांच्या इतिहासाच्या संदर्भातील पाच प्रश्न विचारण्यात येतील. ही स्पर्धा विनामूल्य आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १२ मार्च असून, १५ मार्चला लकी ड्रॉ पद्धतीने त्यातील पाच नावे आणि नंतरची १०० नावे काढली जातील. यात परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे देसडला यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नांची उत्तरे पोस्टाद्वारे प्रश्नमंजूषा स्पर्धा, महाराष्ट्र साहित्य परिषद, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११०३० या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन देता येतील.

Web Title: 'Swimming' train full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.