स्वीमिंग पूलचे पाणी गुल!

By Admin | Updated: September 1, 2015 03:14 IST2015-09-01T03:14:55+5:302015-09-01T03:14:55+5:30

महापालिकेने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी अनुक्रमे २०-५० टक्के पाणी कपात लागू केली असतानाच आता सार्वजनिक तरण तलाव तसेच वातानुकूलन यंत्रणा

Swimming pool water! | स्वीमिंग पूलचे पाणी गुल!

स्वीमिंग पूलचे पाणी गुल!

मुंबई : महापालिकेने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी अनुक्रमे २०-५० टक्के पाणी कपात लागू केली असतानाच आता सार्वजनिक तरण तलाव तसेच वातानुकूलन यंत्रणा (ए.सी. प्लान्ट) यांचा पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणचे पाणी तत्काळ थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी दिले.
बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, उद्याने, तरण तलाव, तारांकित हॉटेल्स, वॉटर बॉटलिंग प्लान्ट्स तसेच ‘वॉटर मीटर्स’ याबाबतही तातडीचे सुधारित निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशानुसार, सामान्य स्वरूपातील पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत म्हणजे जलसाठ्यात पुरेशी सुधारणा होईपर्यंत सार्वजनिक, खासगी उद्यानास नवीन जलजोडणी दिली जाणार नाही. बांधकाम सुरू असलेल्या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा जोडणी ही १५ मिलीमीटरपर्यंत कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून येथे काम करत असलेल्या मनुष्यबळास त्यांच्या आवश्यकतेएवढेच पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल व पाण्याचा संभाव्य दुरुपयोग टाळता येईल.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा दुरुपयोग होत नसल्याची खातरजमा करून घेण्यासाठी २४ प्रशासकीय विभागांना नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक तरण तलाव तसेच वातानुकूलन यंत्रणा (ए.सी. प्लान्ट) यांना सुरू असलेला पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, रुग्णालये, आपत्कालीन सेवा व तत्सम जीवनसुरक्षाविषयक आस्थापना त्याला अपवाद आहेत.
ज्यांना १०० मिलीमीटरपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक आकाराच्या जलजोडण्या देण्यात आल्या आहेत; अशा सर्व व्यावसायिक, औद्योगिक आस्थापना, मॉल्स, तारांकित हॉटेल्स आणि रेसकोर्स यांना सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यात तत्काळ ५० टक्के कपात लागू करण्यात आली आहे.

Web Title: Swimming pool water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.