अंधेरीतील जलतरण तलाव ५ सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या सेवेत
By रतींद्र नाईक | Updated: August 22, 2023 21:58 IST2023-08-22T21:58:12+5:302023-08-22T21:58:41+5:30
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान यांच्यातर्फे चालविण्यात येत असलेला शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सभासदांसाठी सुरू करण्यात येणार असून या क्रीडा संकुलात २ जलतरण तलाव आहेत

अंधेरीतील जलतरण तलाव ५ सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या सेवेत
मुंबई : मुंबईकरांना महापालिकेच्या अंधेरीतील स्विमिंग पुलमध्ये लवकरच डुबक्या मारता येणार आहेत. शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येत्या ५ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असून अभियांत्रिकी कामासाठी हे तरण तलाव काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते.
मुंबईतील नागरिकांना विविध क्रीडा व सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंधेरी (पश्चिम) येथे सन १९८८ मध्ये महानगरपालिकेने शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले आहे. या संकुलाचे व्यवस्थापन व परिरक्षण 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान' या पालिकेच्या सार्वजनिक न्यासाकडे सोपविण्यात आले आहे. या संकुलात क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, खुले मैदान असे एकूण ३ महत्त्वाचे विभाग आहेत. त्याचबरोबर या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कार्डिओ व्यायामशाळा, महिलांकरिता विनामूल्य कराटे प्रशिक्षण वर्ग, जिम्नॅस्टिक, स्केटींग, एरोबिक्स, योग, टेनिस, नृत्य, चित्रकला इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान यांच्यातर्फे चालविण्यात येत असलेला शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सभासदांसाठी सुरू करण्यात येणार असून या क्रीडा संकुलात २ जलतरण तलाव आहेत या पैकी सूर मारण्याच्या तलावाची सुविधा २६ जुलै पासून, तर शर्यतीचा तलावाची सुविधा ८ ऑगस्ट पासून बंद ठेवण्यात आली होती तेथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा, संतुलन टाकी आणि अन्य काही अभियांत्रिकीय दुरुस्ती आणि संबंधित चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत, असे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे यांनी सांगितले.