Join us  

एक्झिट पोलनंतर गोपाळ शेट्टींना नवी 'ऊर्मी'; २३ मे साठी मागवली २००० किलो मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 1:39 PM

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसोबत देशातील प्रत्येक नागरिकाला लागली आहे. निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी दाखविलेल्या एक्झिट पोलमधून एनडीएला पुन्हा बहुमत मिळून केंद्रात सरकार स्थापन करता येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निकाल येण्याआधीच एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचेगोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र गोपाळ शेट्टी यांना विजयाची खात्री असल्याने निवडणूक निकालांपूर्वीच शेट्टी यांनी बोरिवलीतील दुकानदाराला मिठाई बनविण्याची ऑर्डर दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत साडेचार लाख मतांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळविला होता. त्यावेळी शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. गोपाळ शेट्टी यांच्यासाठी अनुकूल असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसने ऊर्मिला मातोंडकरला उमेदवारी देऊन रंगत आणली पण काँग्रेसला निवडणुकीत टायमिंग साधता आलं नाही. निवडणुकीपूर्वी काहीच दिवस आधी ऊर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने उत्तर मुंबईतून ऊर्मिला यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान ऊर्मिला मातोंडकर यांचे कोणतंही आव्हान नसून यंदाही 5 लाखांपेक्षा अधिक मतांनी मी निवडून येईल असा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. त्याच आत्मविश्वासावर गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतल्या मिठाईच्या दुकानदाराला जवळपास 1500-2000 किलो मिठाई बनविण्याची ऑर्डर दिली आहे. सध्या या मिठाईच्या दुकानामध्ये कामगार मिठाईची बनविण्याची तयारी करत आहेत यावेळी नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावून कामगार मिठाई बनवताना पाहायला मिळत आहे. कामगारांना मिठाई बनविताना उत्सुकता आहे त्यामुळे त्यांनी मोदींचे मुखवटे घातल्याचं दुकानदाराने सांगितले. 

केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता येईल असं एक्झिट पोलवरुन अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्ष निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. पण भाजपा उमेदवारांकडून मिठाई बनविण्याची देण्यात आलेली ऑर्डर म्हणजे उमेदवाराचा आत्मविश्वास आहे की फाजील आत्मविश्वास हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक एक्झिट पोलभाजपागोपाळ शेट्टीउर्मिला मातोंडकरमुंबई उत्तर