Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 06:47 IST

ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना १८,५०० रुपये तर सहायक कामगार यांना १२,५०० बोनस जाहीर झाला आहे. त्यामुळे ७४ हजार ८४४ कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी व ३ हजार ९०९ सहायक कर्मचारी व ट्रेनी अभियंते २३ यांची दिवाळी गोड झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरू होती. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

 बैठकीस महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र, महापारेषणचे अध्यक्ष संजय कुमार, महानिर्मितीच्या अध्यक्ष पी. अनबलगन आणि तिन्ही कंपन्यांचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी मोहन शर्मा, कृष्णा भोयर, आर. टी. देवकात, सुहास खुमकर, दत्तात्रय गुट्टे असे २७ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोनस जाहीर केला. बोनस दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

टॅग्स :वीज