सप्तरंगांची उत्साही उधळण
By Admin | Updated: March 6, 2015 23:50 IST2015-03-06T23:50:35+5:302015-03-06T23:50:35+5:30
ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहामध्ये गुरुवारी रात्री पारंपरिक पध्दतीने होळी पेटवून सण साजरा करण्यात आला.

सप्तरंगांची उत्साही उधळण
धूलिवंदनाची धूम : इकोफ्र्रेंडली होळीवर भर, अबालवृद्धांसह तरुणाईचा जल्लोष
नवी मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहामध्ये गुरुवारी रात्री पारंपरिक पध्दतीने होळी पेटवून सण साजरा करण्यात आला.भ्रष्टाचारमुक्त देश, वाईट विचार, वृत्तीचे दहन आणि सामाजिक संदेश होळीच्या माध्यमातून देण्यात आले. तर शुक्रवारी सप्तरंगांमध्ये अबाल वृद्धांसह तरूणाई न्हाऊन निघाली.
होळीनिमित्त नवी मुंबई परिसरामध्ये ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर या गावात पारंपरिक पध्दतीने होळी साजरी करण्यात आली. रात्री आठ पासून ठिकठिकाणी होळी पेटविण्यात आली. ऐरोली येथील साई कृपा सोसायटीच्या वतीने भ्रष्टाचारमुक्त नवी मुंबई आणि वाईट विचारांची होळी करण्यात आली. ही होळी पारंपरिक पध्दतीबरोबर इकोफ्रेंडली करण्याकडे अधिक कल होता. त्यामुळे होळी सजविण्यासाठी झाडांची पिकलेली पाने आणि सुकलेल्या गवताचा वापर करण्यात आला होता.
सारसोळे येथील कोळी बांधवांनी ही पारंपरिक पध्दतीने कोळीवाड्यातील होळी मैदानावरील मध्यरात्री १२ वाजता होळी पेटविण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून कोळी बांधव १२च्या ठोक्यालाच होळी पेटत असल्याने ही होळी नागरिकासाठी आकर्षण ठरत आहे. होळीला पूर्णपणे फुलांनी आच्छादित केलेले होते. होळीच्या सभोवताली फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. अशाच प्रकारची होळी नवी मुंबईतील विविध विभागात, सोसायटी, गावात उत्साहात साजरी करण्यात आली. (प्रतिनिधी)
नवीन पनवेलमध्ये होळीसह पोंगल साजरा
पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. पनवेलमध्ये १५० वर्षांची परंपरा असलेली लाइन आळीमधील होळी पनवेलमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तालुक्यातील गावांमध्ये देखील रात्री ढोल - ताशांच्या गजरात पारंपरिकरीत्या गुरुवारी होळीचे दहन करण्यात आले. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली.
धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण केली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता.
शहरालगतचे हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी डीजे, तसेच होळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल शहर परिसरात मद्यपींनी धिंगाणा घातल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या.
पोंगलची लगबग...
नवीन पनवेलमध्ये हिंदू सेवा समिती व अयप्पा सेवा संघ व जय अंबे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अंबा माता मंदिर परिसरात दक्षिण भारतीय पद्धतीने पोंगल सण साजरा केला. २०० पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.