स्वरसुधाकराला गजलनवाजाची स्वर सलामी
By Admin | Updated: August 31, 2014 01:22 IST2014-08-31T01:20:33+5:302014-08-31T01:22:14+5:30
अकोला येथे सुधाकर अंबुसकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा थाटात.

स्वरसुधाकराला गजलनवाजाची स्वर सलामी
अकोला : काही सुरेल क्षणांना वेचता-वेचता, त्या सूरमोही क्षणांचं एक गाणंच होऊन जातं.. कुणाच्या जीवनाला गुणगुणणारं.. अशीच एक सुरेश बंदिश, प्रसन्न आणि मनमोही अनुभवण्याची संधी शनिवारी अकोलेकरांना लाभली. स्वरसुधाकरला गजलनावाजाने स्वरांची सलामी अर्पण करून स्वरमैफल भावगंधित केली.
गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि ललित कला अँकॅडमी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय तथा सुगम संगीत क्षेत्रातील एक ज्येष्ठ स्वरसाधक, संवादिनी वादनातील एक किमयागार कलावंत आणि सूरवेधी सुरावटीचा ज्येष्ठ संगीतकार सुधाकर अंबुसकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याचे आयोजन शनिवारी रात्री प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके होते. मंचावर सातव्या गजल संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने, ललित कला अँकॅडमीचे उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, गजलनवाज भीमराव पांचाळे उपस्थित होते.
राजदत्त व अरुण शेळके यांच्या हस्ते सुधाकर अंबुसकर यांचा सत्कार करण्यात आला. विजया अंबुसकर यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भीमराव पांचाळे यांनी, तर मानपत्र वाचन अशोक ढेरे यांनी केले. राजदत्त यांनी आपल्या मनोगतातून अंबुसकर यांच्या स्वरसेवेचा गौरव केला. स्वत:साठी जगणारे भरपूर असतात; परंतु आपल्याला कोणी जगवले याचे भान ठेवणारे कमी असतात. त्यापैकीच अंबुसकर एक आहेत. त्यांनी स्वत:सोबतच इतरांनादेखील आनंद दिल्याचे राजदत्त यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना सुधाकर अंबुसकर यांनी भीमराव पांचाळेंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात अरुण शेळके यांनी अंबुसकर यांची स्वरसाधना अखंड सुरू राहो व ते आनंदाचे दान देत राहोत, अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन किशोर बळी यांनी, तर आभार प्रशांत देशमुख यांनी मानले