घुमान महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी
By Admin | Updated: March 4, 2015 00:44 IST2015-03-04T00:44:40+5:302015-03-04T00:44:40+5:30
‘वारी’ ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी जसे दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जातात, तसेच वर्षातून एकदा सर्वांनी घुमानला जावे.

घुमान महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी
पुणे : ‘वारी’ ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी जसे दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जातात, तसेच वर्षातून एकदा सर्वांनी घुमानला जावे. घुमान ही महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी, अशी अपेक्षा ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली.
घुमान येथील साहित्य संमेलनानिामित्त आयोजित प्रकाश पायगुडे यांनी लिहिलेल्या ‘साहित्यवारी घुमानद्वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार चरणजित सप्रा यांच्या हस्ते मंगळवारी साहित्य परिषदेच्या सभागृहात झाले. अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे आयोजक, सरहद्द संस्थेचे संजय नहार, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, संतसिंग मोखा, नांदेडच्या नानकसाई फाउंडेशनचे पंढरीनाथ बोकारे, जगदीश कदम, संगत प्रकाशनचे जयप्रकाश सुरनूर आणि लेखक प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘संत नामदेव हा पंजाब आणि महाराष्ट्राला जोडणारा दुवा आहे. त्यामुळे घुमान हे शीख बांधवांबरोबरच महाराष्ट्रातील लोकांचे तीर्थक्षेत्र व्हावे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये पंढरपूरच्या वारीला जे महत्त्व आहे तेच महत्त्व आगामी काळात घुमानला प्राप्त झाले पाहिजे. घुमानमध्ये नामदेव महाराजांनी केलेले कार्य हाच केवळ तिथे संमेलन आयोजित करण्याचा एकमेव संदर्भ नसून, त्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये भाषिक ॠणानुबंध आहेत. तेच या संमेलनाच्या निमित्ताने दृढ होत आहेत.’’ कवी डॉ. जगदीश कदम यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
४चरणजित सप्रा म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या भूमीला जसा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याचप्रमाणे पंजाबला गुरू गोविंदसिंग यांचा इतिहास आहे. संत नामदेव यांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात घुमनाला येऊन कार्य केले. त्याचप्रमाणे गुरू गोविंदसिंग यांनी नांदेड येथे जाऊन कार्य केले. दोन्ही संतांच्या दूरदृष्टीमधून दोन राज्यांमध्ये नाते निर्माण होण्याची ही नांदी होती.’’