मीरारोडमध्ये महापालिकेचा सफाई कामगारांसह स्वच्छता मार्च
By धीरज परब | Updated: September 16, 2023 16:57 IST2023-09-16T16:56:34+5:302023-09-16T16:57:11+5:30
जनजागृतीसाठी कामगारांकडून स्वच्छता मार्चचे आयोजन

मीरारोडमध्ये महापालिकेचा सफाई कामगारांसह स्वच्छता मार्च
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: इंडियन स्वच्छता लीग च्या अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकां मध्ये जनजागृतीसाठी मीरारोड येथे सफाईकामगारांसह स्वच्छता मार्च चे आयोजन केले होते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचना नुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग पर्व २ ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीचे मीरा भाईंदर स्वच्छाग्रही असे संघाचे नाव कायम ठेवत संघाचे कर्णधार म्हणून आयुक्त संजय काटकर यांची निवड करण्यात आली.
इंडियन स्वच्छता लीग २ बाबत जनजागृतीसाठी शुक्रवारी मीरारोड स्टेशन पासून सृष्टी, जांगिड कॉम्प्लेक्स, बालाजी हॉटेल येथून रसाज मॉल पर्यंत स्वच्छता मार्च काढण्यात आला .यामध्ये सफाई कामगार, स्थानिक
राजकारणी, नागरिक, अधिकारी यांच्यासह कचऱ्याच्या गाड्या, सफाई यंत्रचा समावेश होता. स्पर्धा काळात बीच क्लीनअप, पर्यटन स्थळांची स्वच्छता, प्लॉग रन, स्वातंत्र्य सेनानी स्मारकांची स्वच्छता, नियमित रस्त्यांची सफाई, कचरा विलगिकरण जनजागृती, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, प्लास्टिक संकलन व ई - कचरा संकलन मोहीम, शालेय पातळीवर निबंध, चित्रकला इत्यादी स्पर्धा, प्रभाग निहाय स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विविध शाळा, महाविद्यालये , स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिक, एनसीसी, स्काऊट, एनएसएस यासारख्या संस्थेचे विद्यार्थी आदींनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . उपक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्टलवर किंवा क्युअर कोडच्या माध्यमातून नोंदणी करावी. नागरिकांनी या विविध मोहिमेत सहभाग घेऊन पुन्हा एकदा शहराला क्रमांक १ चे शहर बनवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त काटकर यांनी केले आहे.