सुट्यांचा मेगाप्लान
By Admin | Updated: August 15, 2014 02:43 IST2014-08-15T02:43:19+5:302014-08-15T02:43:19+5:30
सलग चार दिवस आलेल्या सुट्यांची संधी साधून मुंबईकरांनी मौजमजा करण्यासाठी मेगाप्लान आखला आहे.

सुट्यांचा मेगाप्लान
मुंबई : सलग चार दिवस आलेल्या सुट्यांची संधी साधून मुंबईकरांनी मौजमजा करण्यासाठी मेगाप्लान आखला आहे. अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत पर्यटनस्थळी जाण्याचा मार्ग निवडला असून महाराष्ट्रातीलच पर्यटनस्थळांना सर्वात जास्त पसंती देण्यात आली आहे.
१५ आॅगस्ट रोजी असणारी सुटी, त्यानंतर रविवारची आठवड्याची सुटी आणि १८ आॅगस्टला असणारी दहीहंडी पाहता अनेकांनी मौजमजा करण्यासाठी सलग चार दिवस सुट्यांचा प्लान आखला आहे. १६ आॅगस्टला येणारा शनिवार आणि १८ आॅगस्टला असणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी कार्यालयांना दांडी मारून चार दिवस सुटीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पावसाळी दिवस सुरू असल्याने अनेकांनी महाबळेश्वर, माथेरान, गोवा, अलिबाग, कोकण, लोणावळा या ठिकाणी जाणे पसंत केले आहे. या ठिकाणी असलेले सर्व रिसॉर्ट चार दिवस फुल्ल झाले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राजस्थानमधील माउंट अबू आणि मध्य प्रदेशमधील पंचमडी या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासही पसंती दिली आहे.
पावसाचे दिवस असल्याने अनेकांनी पावसाळी स्पॉट असलेल्या ठिकाणी जाणे पसंत केले आहे. तर महाराष्ट्राबाहेरीलही काही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. अनेक रिसॉर्टही फुल्ल झाले आहेत. अशी सलग सु्टी आल्याने त्याचीच संधी उचलत अनेकांकडून हा प्लान आखला असल्याचे सचिन जकातदार (सचिन ट्रॅव्हल्स संचालक) यांनी सांगितले.
चार दिवस आयती सुटी आल्याने मुंबईकरांनी संधी साधत बाहेर फिरायला जाणे पसंत केले आहे. त्यासाठी जवळच्याच पर्यटनस्थळांना पसंती दिली आहे. महाबळेश्वर, माथेरान, कोकणातील स्पॉटला सर्वात जास्त पसंती असल्याचे सुधीर पाटील (विणाज वर्ल्ड, संचालक) म्हणाले.(प्रतिनिधी)