विकासकामे पाहावत नसल्याने निलंबन
By Admin | Updated: June 15, 2015 23:00 IST2015-06-15T23:00:34+5:302015-06-15T23:00:34+5:30
रायगड जिल्हा काँग्रेसच्यावतीने नुकतीच पनवेलच्या नगराध्यक्षांवर सहा वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विकासकामे पाहावत नसल्याने निलंबन
पनवेल : रायगड जिल्हा काँग्रेसच्यावतीने नुकतीच पनवेलच्या नगराध्यक्षांवर सहा वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनाबाबत आपली बाजू मांडण्यासाठी सोमवारी नगरपरिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत यांच्यावर टीका केली. मी केलेली विकासकामे पाहावत नसल्यानेच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने केलेली निलंबनाची कारवाई मला मान्य नाही. मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही, मला निलंबनाबाबतची माहीत नव्हती. वृत्तपत्रातून माहिती मिळाल्याचे घरत यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा म्हणून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले नसून सर्व नगरसेवकांना सोबत घेवून पनवेलचा विकास केला. निलंबनाचे मला कोणत्याही प्रकारचे पत्र मिळालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पनवेलमध्ये आर.सी.घरत यांनी काँग्रेसचा ६२ वर्षांचा इतिहास धुळीस मिळवला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्याचा पराक्रम त्यांनी केल्याची टीका चारुशीला घरत यांनी केली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक प्रकाश बिनेदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )