Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वर्तनाला निलंबनाचा चाप? १५ दिवसांसाठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:40 IST

Mumbai News:महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्षसदस्यांकडून सातत्याने सभात्याग केला जात असल्याने सत्ताधारी महायुती आता पालिका अधिनियमाचा आधार घेत पलटवार करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई -  महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्षसदस्यांकडून सातत्याने सभात्याग केला जात असल्याने सत्ताधारी महायुती आता पालिका अधिनियमाचा आधार घेत पलटवार करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. सभागृहात बेशिस्त वर्तन करणाऱ्या सदस्यांना बाहेर काढणे, तसेच त्याच सदस्याने पुनरावृत्ती केल्यास १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्याच्या तरतुदींचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिका सभागृहात विरोधी पक्ष विविध मुद्दे उपस्थित करीत आहेत. त्यावर योग्य उत्तरे न मिळाल्यास प्रसंगी सभात्याग तसेच निषेध नोंदवित आहेत. त्यामुळे विरोधकांच्या सभात्यागाला  उत्तर देण्यासाठी सत्ताधारी, अधिनियमातील तरतुदींचे अस्त्र वापरण्याच्या तयारी आहेत, असे त्यांच्या गोटातून समजते. 

अधिनियमातील तरतुदी... अधिनियमातील तरतुदींनुसार, महापालिका सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आणि शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नियम स्पष्ट आहेत. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि सदस्यांच्या उपस्थितीबाबत ‘अध्यक्ष-प्राधिकाऱ्यां’ना अर्थात महापौरांना विशेष अधिकार आहेत. याच अधिकारांचा वापर करून भविष्यात सत्ताधारी विरोधकांना जेरीस आणणार, हे स्पष्ट झाले आहे.

निलंबन, उपस्थितीचे नियमबेशिस्त वर्तणुकीबद्दल जर एखाद्या पालिका सदस्याला महापौरांनी सभागृहातून बाहेर जाण्याचा आदेश दिला असेल; आणि असा आदेश १५ दिवसांत त्याच सदस्याला दुसऱ्यांदा दिला असेल, तर संबंधित सदस्याला १५ दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केले जाऊ शकते. या कालावधीत संबंधित सदस्याला महापालिकेच्या सभांना उपस्थित राहता येणार नाही. मात्र, हे निलंबन तीन सभांपेक्षा जास्त कालावधीसाठी नसेल, अशी मर्यादाही अधिनियमात घालण्यात आली आहे. 

माफी आणि सवलतनिलंबन केलेल्या सदस्याने जर माफी मागितली आणि त्या माफीनाम्यामुळे  अध्यक्षांचे समाधान झाले, तर त्याला माफी मिळू शकते. मात्र, निलंबित सदस्याचे निलंबन हे फक्त सभागृह बैठकीपुरते असेल. संबंधित सदस्य पालिकेच्या विविध समित्यांवरील आपले कामकाज नियमितपणे सुरू  ठेवू शकतो.

सभात्याग करण्यात उद्धवसेना आघाडीवर विरोधी पक्षात उद्धवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि मनसे हे पक्षही आहेत. मात्र, सभात्यागाचे हत्यार प्रामुख्याने उद्धवसेनेकडून उपसले जात असल्याचे दिसून आले आहे. सभात्याग करताना विरोधकांकडून गोंधळ केला जातो, आक्षेपार्ह विधाने केली जातात, असा सत्ताधारी पक्षाचा आक्षेप आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Disciplinary Action Looms: Suspension for Disorderly Conduct in Mumbai Municipality

Web Summary : Mumbai's ruling coalition considers suspending unruly corporators for up to fifteen days. This action follows repeated walkouts by opposition members. The move risks escalating tensions between ruling and opposition parties within the municipality.
टॅग्स :मुंबई महानगरपालिका