कोट्यवधींच्या कामांना स्थगिती
By Admin | Updated: August 11, 2015 01:35 IST2015-08-11T01:35:43+5:302015-08-11T01:35:43+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ठरल्याचे पुढे आले आहे. आर्थिक तरतूद नसतानाही कोट्यवधींची कामे मंजूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व आर्थिक विषयांना

कोट्यवधींच्या कामांना स्थगिती
बदलापूर : अंबरनाथ नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ठरल्याचे पुढे आले आहे. आर्थिक तरतूद नसतानाही कोट्यवधींची कामे मंजूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व आर्थिक विषयांना स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तब्बल २०० कोटींपेक्षाही अधिकच्या विकासकामांना फटका बसला आहे.
मे महिन्यात सत्तेवर आलेल्या शिवसेनेने नगराध्यक्षपद प्रज्ञा बनसोडे यांना दिले. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा १७ जुलै रोजी घेण्यात आली. या सभेची विषयपत्रिका तयार करण्यासाठी एक महिना गेला होता. या विषयपत्रिकेत सर्व ६२ नगरसेवकांची विकासकामे मंजुरीसाठी घेण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकाचे किमान २ कोटींचे विषय या विषयपत्रिकेत घेण्यात आले होते. तर, उर्वरित ७० ते ८० कोटींचे सर्वसमावेशक असे काही विषय घेण्यात आले होते. या विषयपत्रिकेत साधारणत: २०० कोटींपेक्षा जास्तीची कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली. सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे असल्याने या सर्वसाधारण सभेत बहुसंख्य नगरसेवकांनी कोणताही विरोध न करता हे विषय मंजूर केले होते. या सभेत शिवसेनेच्या दोन गटांतील मतभेद समोर आल्याने त्यातील एका गटाने विषयपत्रिकेतील काही कामांना विरोध केला होता. या विरोधानंतर त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला होता. तसेच या सर्वसाधारण सभेची माहिती पालिकेकडून मागविली होती.
पालिकेच्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेतील विषयांना अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने ते विषय स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सभेचे इतिवृत्त स्वयंस्पष्ट अहवालासह पाठविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. सेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे ही वेळ आल्याची प्रतिक्रिया आता शिवसेनेचेच काही नगरसेवक देत आहे.