नालेसफाईप्रकरणी अभियंते निलंबित

By Admin | Updated: September 19, 2015 23:24 IST2015-09-19T23:24:01+5:302015-09-19T23:24:01+5:30

नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी अखेर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सकृतदर्शनी दोषी आढळून आलेले तीन मुकादम/जलनि:सारण सहायक, ६ दुय्यम अभियंता

Suspended engineers in Nalesfai case | नालेसफाईप्रकरणी अभियंते निलंबित

नालेसफाईप्रकरणी अभियंते निलंबित

मुंबई : नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी अखेर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सकृतदर्शनी दोषी आढळून आलेले तीन मुकादम/जलनि:सारण सहायक, ६ दुय्यम अभियंता आणि ४ सहायक अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर व्हीटीएस आॅपरेटर-मेसर्स फ्लेक्सीटेक प्रायव्हेट लिमिटेड, नालेसफाई कंत्राटदार-मेसर्स आकाश इंजिनीअरिंग कन्स्लटंट, आर.ई. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स नरेश ट्रेडर्स, वजनकाटा ठेकेदार-मेसर्स लकी वे ब्रिज, मेसर्स साईराज फुल्ली कॉम्प्युटरराईज वे ब्रिज, मेसर्स देवनार वे ब्रिज यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी यंदा दोन वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच २०१५-१६ ते २०१६-१७ या वर्षांकरिता एकूण ३२ कंत्राटदार निविदे प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आले होते. संबंधितांना पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यादरम्यान २० टक्के व उर्वरित कालावधीत २० टक्के अशा रीतीने नालेसफाईचे काम देण्यात आले होते. मात्र नालेसफाईच्या कामात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणी समितीने मत चौकशीचे आदेश दिले होते.
समितीकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालाअंती नालेसफाईत घोटाळा झाल्याचे आढळले होते. परिणामी, या प्रकरणी संबंधित व्हीटीएस ठेकेदार, वजनकाटा ठेकेदार आणि नालासफाई कंत्राटदारांनी संगनमताने खोटा रेकॉर्ड तयार करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीत सर्व मोठ्या नाल्यांसंबंधी नालेसफाई कंत्राटी कामाची रक्कम रोखण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

नक्की काय झाले...
एकाच वेळी किंवा वेळेतील अत्यल्प फरकाने दोन ठिकाणांहून नाल्यामधून गाळ काढून वाहून नेल्याचे दाखविण्यात आले आहे.
परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेल्या वाहन नोंदणी पुस्तिकेमध्ये वाहनाची भार वाहून नेण्याची क्षमता नमूद केलेली असते. अनेक वजन-काटा पावतीमध्ये दर्शविलेला गाळ भरलेल्या वाहनाचे वजन व परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेल्या वाहन नोंदणी पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या त्या वाहनाच्या अधिकतम भार क्षमतेपेक्षा बराच अधिक आहे, म्हणजेच वजन-काटा पावती बनावट असल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे.
या प्रकरणी वापरण्यात आलेल्या व्हीटीएस प्रणालीद्वारे वाहन फेऱ्यांचा पुरावा सादर करण्यात आला आहे. परंतु त्या पुराव्यामध्ये वाहन फेऱ्यांची माहिती केव्हा नोंदविण्यात आली; आणि त्याची प्रिंट कधी घेतली त्याची तारीख नाही. त्यामुळे ती कागदपत्रेही बनावट असल्याचे आढळले.
प्रमुख अभियंता (दक्षता) यांनी मोठ्या कंत्राटावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. स्थायी समितीत चर्चा होत असतानाही कामाची दखल घेतली नाही. तसेच त्यांनी त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी कोणती तपासणी केली याबाबत खातरी केली नाही. किंबहुना स्वत:हूनदेखील या प्रकरणी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी जाऊन पाहणी केली नाही. म्हणजेच त्यांच्याकडून अपेक्षित असलेले कर्तव्य बजावण्यात ते असमर्थ ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

Web Title: Suspended engineers in Nalesfai case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.