महिलांना अश्लील मेसेज पाठविणारा निलंबित कॉन्स्टेबल गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:11 IST2018-03-19T05:11:02+5:302018-03-19T05:11:02+5:30
तरुणी, महिलांना अश्लील मेसेज पाठवून छळ करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका निलंबित कॉन्स्टेबलला रविवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली.

महिलांना अश्लील मेसेज पाठविणारा निलंबित कॉन्स्टेबल गजाआड
मुंबई : तरुणी, महिलांना अश्लील मेसेज पाठवून छळ करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका निलंबित कॉन्स्टेबलला रविवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. शैलेश कदम (वय २८, रा. हिंदमाता, दादर) असे त्याचे नाव असून साडेचार वर्षांपूर्वी जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याला निलंबित करण्यात आले होते. अशाच प्रकारे महिलांचा छळ केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जुहू आणि कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कदम हा हिंदमाता येथे राहत असलेल्या इमारतीतच पीडित तरुणीच्या वडिलांचे दुकान आहे. ती दुकानात बसली असताना कदम हा त्या ठिकाणी येरझाºया घालून इशारे करीत असे. त्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुकवर तिच्याबाबत अश्लील कॉमेंट करू लागला. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर तो जास्तच त्रास देऊ लागल्यानंतर तरुणीने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रविवारी पोलिसांनी शैलेश कदमला अटक केली. कदमने वर्षापूर्वी तिची छेड काढल्याबद्दल त्याला अटक केली होती. त्या वेळी माफी मागितल्याने तक्रार मागे घेण्यात आली होती.
छेडछाड करण्याची विकृती
महिला, तरुणीची छेडछाड, अश्लील मेसेज करण्याची शैलेश कदमला विकृती आहे. त्याबाबत जुहू, कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.