Join us  

फोटो मॉर्फ केल्याचा संशय, शाळेच्या विश्वस्ताकडून विद्यार्थ्याला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 6:35 AM

जेरी जोसेफ (43) असे विश्वस्ताचे नाव आहे.

मुंबई : शिक्षक तसेच विश्वस्ताचे फोटो मॉर्फिंग करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या संशयावरून शाळेच्या विश्वस्ताकडून दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडच्या एका नामांकित शाळेत घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या विश्वस्ताविरुद्ध रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेरी जोसेफ (43) असे विश्वस्ताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 15 वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास शाळेत गेला. साडे अकराच्या सुमारास अन्य विद्यार्थ्यांबरोबर तो प्रयोगशाळेत वर्गात गेला. तेथून बाहेर पडल्यानंतर पाणी पिण्यासाठी तळ मजल्यावर आला असता, विश्वस्त जोसेफ यांनी त्याला पाठीमागून लाथ मारत खाली पाडले. तेथूनच मारहाण करत त्यांच्या कार्यालयात नेले. तेथेही त्याला मारहाण करत त्याच्या गुप्तांगावर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.

याचदरम्यान शिक्षक विनय सुद्धा उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शाळेचे शिक्षकांचे फोटो मॉर्फ करत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यापाठोपाठ विश्वस्ताचा फोटोही विद्यार्थ्यांकडून व्हायरल करण्यात आला. यामागे मारहाण केलेल्या तरुणाचा हात असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्याने याबाबत वारंवार सांगून देखील त्याला मारहाण सुरु असल्याचे मुलाने आईला सांगितले. काही कामानिमित्त विश्वस्त बाहेर जाताच मुलाने तेथून पळ काढून घर गाठल्यानंतर वरील घटनाक्रम उघडकीस आल्याचे मुलाच्या आईचे म्हणणे आहे. त्यानुसार मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारी