मानखुर्दमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: January 9, 2017 07:05 IST2017-01-09T07:05:25+5:302017-01-09T07:05:25+5:30
पतीपासून वेगळी राहात असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी मानखुर्द परिसरात आढळून आला आहे.

मानखुर्दमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : पतीपासून वेगळी राहात असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी मानखुर्द परिसरात आढळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही माहिला बेपत्ता होती. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. संजना शेख असे मृत महिलेचे नाव आहे.
मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर परिसरात ती राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती पतीपासून वेगळी झाल्यानंतर बहिणीसोबत राहात होती, तर वांद्रे परिसरात ती घरकाम करत होती. ५ जानेवारीला ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाली.
मात्र, रात्रीपर्यंत घरी न परतल्याने तिच्या बहिणीने ती कामावर जात असलेल्या ठिकाणी चौकशी केली. मात्र, त्याठिकाणी ती कामावर गेलीच नसल्याचे समजले. त्यानुसार, या महिलेच्या बहिणीने ६ तारखेला ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, पोलीस या महिलेचा शोध घेत असतानाच, रविवारी सकाळी एका नाल्याजवळील झुडपात तिचा मृतदेह एका रहिवाशाच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. महिलेच्या शरीरावर पोलिसांना कुठल्याही जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल,
अशी माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)