Join us  

सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 3:01 AM

काँग्रेसच्या बैठकीत मागणी; उर्मिला मातोंडकरांनी केले गंभीर आरोप

अतुल कुलकर्णी

मुंबई : विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवावी. पक्षाकडील दलित समाजाचे एक मोठे नेतृत्व आपण निवडणुकीसाठी समोर आणले पाहिजे, अशी मागणी अनेक नेत्यांनी शुक्रवारी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली. तर माझ्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी काम केले नाही, असा आरोप उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंंडकर यांनी बैठकीत केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यांची चर्चा झाली. बैठकीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, ते दलित समाजाचे मोठे नेते आहेत. महाराष्टÑात व देशात त्यांनी चांगले काम केले आहे, ते अनुभवी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रपणे निवडणूक लढवली तर त्यातून राज्यात चांगला संदेश जाईल, असेही काही नेत्यांनी सांगितले. उर्मिला मातोंडकर यांनी अनेक गंभीर बाबी समोर आणल्या. ज्यांनी मला निवडणुकीसाठी पक्षात आणले तेच नंतर गायब झाले, असे त्यांनी संजय निरुपम यांचे नाव न घेता सांगितले. माझ्यासाठी राष्टÑवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम केले पण मी ज्या काँग्रेसतर्फे उभे होते त्या पक्षाच्या नेत्यांनी माझे काम केले नाही असा गंभीर आक्षेपही त्यांनी घेतला. काहींनी भाजपशी हातमिळवणी केली, असा आरोपही त्यांनी केला. मी पराभूत झाल्यानंतरही पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वांना माझ्या खर्चाने चहासाठी बोलावले मात्र त्यासाठी राष्टÑवादी आणि मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आले पण काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पाठ फिरवली. जे येऊ इच्छित होते त्यांना येऊ दिले नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यावर मिलिंद देवरा यांनी आम्ही तुमच्यासाठी काम केले होते, तुमच्या उमेदवारीचा सर्वांना फायदा झाला असे सांगितले.

संजय निरुपम यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाची चर्चा निरुपम यांच्या उपस्थितीत करा, ते आज नाहीत असे राजेश शर्मा यांनी सांगितले त्यावर अनेक नेते भडकले. आम्ही काय येथे वेळ घालवायला आलोय का? त्यांना चर्चा करायची होती तर त्यांनी यायला हवे होते असेही काही नेत्यांनी स्पष्ट केले. राजेश शर्मा हे भाजपच्या मंत्री विद्या ठाकूर यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे ही जागा राष्टÑवादीला सोडा असा आग्रह ते धरत होते त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतले. 

टॅग्स :सुशीलकुमार शिंदेकाँग्रेसविधानसभा