Join us  

...तर मी नावं जाहीर करेन; सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाचा नवीन धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:00 AM

सोशल मीडियावर घराणेशाहीला खूप मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रानौतने धक्कादायक खुलासे केले. तिच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर घराणेशाहीला खूप मोठा विरोध होताना पाहायला मिळाला. त्यानंतर आता, ‘मला चौकशीला बोलावले तर मी खरी नावे जाहीर करेन’, असे ती म्हणाली.कंगनाने नुकत्याच दिलेल्या स्टेटमेंटमध्ये दिग्दर्शक, निर्माता मुकेश भट यांच्यावर तीव्र टीका केली. मुकेश भट यांनी सुशांतच्या निधनानंतर म्हटले होते की, जवळपास दीड वर्षापूर्वी सुशांतला भेटलो त्या वेळीच मला असे काही घडेल असे वाटले होते. कंगनाने नुकत्याच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी जेव्हा हे बोलतेय तेव्हा माझे हात थरथरत आहेत. आपण चीनमुळे संकटात आहोत. आपले काही जवान बॉर्डरवर शहीद झाले आहेत. पण माझ्या डोक्यातून सुशांतची आत्महत्या जात नाही. कंगना म्हणाली की, सुशांतला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया होता अशी अफवा उडाली. मुकेश भट दावा करीत आहेत की, सुशांत परवीन बाबींच्या मार्गावर जात होता. मात्र कोणाला लक्षात आहे की परवीन बाबींसोबत या लोकांनी काय केले होते?कंगना पुढे म्हणाली की, माझे सुशांत आणि माझा म्युच्युअल फ्रेंड असलेल्या कमल जैनसोबत बोलणे झाले. त्याला माहीत आहे की, सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण होते. कमलजीने मला सांगितले की, त्याचे सोमवारी सुशांतसोबत बोलणे झाले. तो असा बोलत होता जसा तो यापूर्वी कधीच बोलला नव्हता. त्याने सांगितले होते की, माझ्यासोबत एक मोठा सिनेमा बनवा. मी हिट सिनेमे दिले आहेत, मात्र माझ्याकडे सध्या कोणताच मोठा सिनेमा नाही. मला जसे हवेय तसे काम नाही.कमलजींनी त्याला विश्वास दिला होता की लॉकडाऊन संपल्यावर त्याच्यासोबत काहीतरी काम करेन. याचा अर्थ असा की तो त्याच्या कामामुळे त्रस्त होता. लोकांनी त्याला बाजूला केले होते. कंगना म्हणाली, कमल जैनसोबत तिचे बोलणे झाल्यानंतर तिला सुशांतशी निगडित गोष्ट समजली आहे. तिने कित्येक नावांची हिंटदेखील दिली, मात्र जर चौकशी झाली तरच ती याबद्दल सांगेल, अशी तिने अट ठेवली.सुशांतविरोधात बनवली होती गँगसर्वांना माहीत आहे की, सुशांतला बाजूला काढून टाकण्यासाठी या लोकांनी कशा पद्धतीने गँग बनवली होती. मी यापूर्वीच याबद्दल बोलले आहे आणि जर चौकशी केली तर ओपनली सांगेन, कारण मीडियाकडे खूप पुरावे आहेत. प्रत्येकाला माहीत आहे की कोण कोण त्याच्या विरोधात गँग बनवून उभे होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकंगना राणौत