Join us
Daily Top 2Weekly Top 5

नायर रुग्णालयात ३ निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:42 IST

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात रविवारी सायंकाळी रुग्णाच्या नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली.

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात रविवारी सायंकाळी रुग्णाच्या नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयातील वस्तूंचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि नायर रुग्णालय प्रशासनाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.या घटनेत डॉ. दीपाली पाटील, डॉ. गौरव गुंजन, डॉ. मॉइज व्होरा आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांनी या घटनेचा मानसिक धक्का घेतल्याची माहिती सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. डॉ. डोंगरे यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी राजकिशोर दीक्षित (४९) याला वॉर्ड क्रमांक २३ मध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णाच्या कुटुंबीयांना सांगितले होते. रुग्णाने स्वत:च अन्ननलिकेजवळ लावलेल्या ट्यूब काढून टाकल्या. त्यामुळे प्रकृती गंभीर होऊन श्वसनास त्रास होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी गोंधळ करीत डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण केली.