समुद्रातील तेल सर्व्हेक्षण जैवविविधतेच्या मुळावर
By Admin | Updated: June 19, 2015 00:07 IST2015-06-19T00:07:21+5:302015-06-19T00:07:21+5:30
ओएनजीसीने समुद्रातील तळाशी तेल सर्वेक्षणासाठी केलेल्या स्फोटाचे दुष्परिणाम हळुहळू समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यात डॉल्फिन, व्हेल व समुद्रीकासवांचे

समुद्रातील तेल सर्व्हेक्षण जैवविविधतेच्या मुळावर
पालघर : ओएनजीसीने समुद्रातील तळाशी तेल सर्वेक्षणासाठी केलेल्या स्फोटाचे दुष्परिणाम हळुहळू समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यात डॉल्फिन, व्हेल व समुद्रीकासवांचे मृतदेह किनाऱ्यावर आढळत आहेत. त्यामुळे समुद्री जैवविविधताच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न ओएनजीसी करीत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अलिकडच्या काळात २५ ते ३० मृत डॉल्फिन समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले असून सातपाटीमध्येही गुरुवारी ७ ते ८ फुटाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला. काही महिन्यापूर्वी व्हेल माशाचे अवशेष, समुद्री कासवे, सातपाटी-शिरगाव दरम्यानच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आले होते. त्यामुळे ओएनजीसीकडून समुद्रात सर्व्हेक्षणाच्या नावावर समुद्री तळाशी होणारे स्फोट माशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. या स्फोटाच्या घातक परिणाम डॉल्फीन, व्हेल, समुद्री कासवे इतर माशांवर होऊन सातपाटी, केळवा आदी भागातील समुद्र किनाऱ्याजवळ दिसणारे मासे आता नाहीसे झाले आहे. या स्फोटामुळे जैवविविधता नष्ट होऊन मत्स्य संवर्धनाच्या प्रक्रियेलाच तडा जाण्याची शक्यता महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती मुंबई विभागाच्या महिला अध्यक्ष उज्वला पाटील यांनी व्यक्त केली आहे. ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे अनेक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भरपाई अद्यापही देण्यात आली नाही. उलट त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून मच्छीमारावर फायरींग केली जात असल्याने ओएनजीसीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)