पेंडखळेतील ‘त्या’ आवाजांचे सर्वेक्षण

By Admin | Updated: August 14, 2014 22:40 IST2014-08-14T22:31:33+5:302014-08-14T22:40:56+5:30

शासनाच्या जीएसआय विभागाकडून सर्वेक्षण होणे गरजेचे

Survey of those 'sounds' | पेंडखळेतील ‘त्या’ आवाजांचे सर्वेक्षण

पेंडखळेतील ‘त्या’ आवाजांचे सर्वेक्षण

राजापूर : पेंडखळे सातोपेवाडीमध्ये भूगर्भातून येणाऱ्या स्फोटक आवाजांच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाचे कनिष्ठ वैज्ञानिक प्रशांत गोलांगे यांनी पेंडखळेमध्ये जाऊन त्या भागाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाच्या जिआॅलॉजिकल सर्वे आॅफ इंडियाला सादर केल्यानंतर व त्यांच्याकडून होणाऱ्या सर्वेक्षणानंतर भूगर्भातून येणारे स्फोटक आवाज नक्की कोणत्या प्रकारचे आहेत, याची निश्चिती होणार आहे.
पेंडखळे गावातील ग्रामस्थ प्रकाश पेडणेकर यांच्या घरानजीक गोठ्याच्या बाजूला वडाच्या झाडानजीक भूगर्भातून स्फोटासारखा आवाज ठराविक वेळेत येतात. असे प्रकार मागील सहा महिन्यांतून अधिक काळ सुरु आहेत. यापूर्वी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी त्या गावाला भेट देऊन पाहणी करून याची माहिती जाणून घेतली होती.
त्यानंतर तहसीलदारांच्यावतीने शासनाच्या भूजल सर्वे व भूगर्भ विभागाशी तत्काळ पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भूजल सर्वेक्षणाचे कनिष्ठ वैज्ञानिक प्रशांत गोलांगे यांनी मंगळवारी पेंडखळे सातोपेवाडीला भेट देऊन त्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांच्यासमवेत राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे उपस्थित होते.
त्यावेळी भूजल सर्वेक्षणाच्या कनिष्ठ वैज्ञानिकांनी त्या परिसराची पाहणी केली. लगतच असणारी नदी आजूबाजूच्या जमिनी यांची त्यांनी पाहणी केली. भूगर्भातून स्फोटासारखे येणारे आवाज, कितीवेळा येतात, त्यांचे स्वरुप कसे असते, यासहीत विविध विषयांवर त्यांनी उपस्थित असलेल्या परिसरातील ग्रामस्थांकडून माहिती घेतली.सर्व मिळालेली माहिती व घटनास्थळावरील प्रत्यक्ष केलेली पाहणी याचा अहवाल तयार करण्यात आला असून, आपण भूजल सर्वेक्षणाचे वरिष्ठ वैज्ञानिक पी. बी. निखाडे यांच्याशी चर्चा केली आहे, असे गोलांगे म्हणाले. (प्रतिनिधी)


पेंडखळे सातोपेवाडीत भूगर्भातून येणाऱ्या स्फोटक आवाजांच्या पार्श्वभूमीवर आमच्या विभागाच्यावतीने त्या भागाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी होणाऱ्या स्फोटामुळे कुठे जमिनीला भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे, नदीचा प्रवाह बदलणे, पडझड होणे असे प्रकार घडलेले नसल्याचे आढळून आले आहे. शिवाय येणारा स्फोटांचा आवाज एकाच ठिकाणावरुन येत आहे, त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी तसे आवाज येत नसल्याने घाबरण्यासारखी परिस्थिती नसली तरी याबाबत गाफील राहूनही चालणार नाही. तेथे निवास करणाऱ्या जनतेला धोका पोहोचू नये, याचा विचार करत शासनाच्या जीएसआय विभागाकडून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यातूनच त्या आवाजांबाबत निश्चिती कळू शकेल. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व राजापूर तहसीलदारांना पाठवला जाणार आहे.
- पी. बी. निखाडे,
वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, रत्नागिरी

Web Title: Survey of those 'sounds'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.