Join us  

कपडे धुऊन न मिळाल्याने शस्त्रक्रिया रखडल्या, सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:53 AM

महापालिकेच्या सायन रुग्णालयात सोमवारी युरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल ३० ते ४० शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई  - महापालिकेच्या सायन रुग्णालयात सोमवारी युरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल ३० ते ४० शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रभादेवी येथील सेंट्रल लाँड्रीमध्ये मनुष्यबळाच्या अभावी कपडे धुऊन रुग्णालयाला न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे.सायन रुग्णालयातील ५० टक्के कपडे खासगी लाँड्रीमध्ये व ५० टक्के कपडे सेंट्रल लाँड्रीमध्ये धुवायला जायचे. मात्र जून २०१७ मध्ये खासगी लाँड्रीचे कंत्राट संपल्याने सर्व कपडे पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीत धुण्यास जाऊ लागले. पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीमध्ये ८३ कर्मचारी दिवसाला १६ हजार कपडे धुऊ शकतील इतकी क्षमता आहे. मात्र सध्या या लाँड्रीमध्ये केवळ ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचे ओझे येते. हे कर्मचारी दिवसाला केवळ १० हजार कपडे धुतात. शिवाय, या लाँड्रीमध्ये कपडे धुण्याच्या १० यंत्रांपैकी आठच यंत्रे कार्यरत आहेत. लाँड्रीत कपडे धुण्यास गेले की १० ते १२ दिवसांनी परत मिळतात. याविषयी, काँग्रेसचे नगरसवेक अशरफ आझमी यांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात सेंट्रल लाँड्रीतील रिक्त कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्याच मागणीनुसार खासगी लाँड्रीच्या कंत्राटाची प्रक्रिया सुरू केल्याचे महापालिकेने या घटनेनंतर कळवले आहे.अनंत चतुर्दशीमुळे पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीत मनुष्यबळ कमी होते. त्यामुळे कपडे धुऊन वेळेवर मिळाले नाहीत. या शस्त्रक्रिया नव्या वेळापत्रकानुसार नियोजित केल्या आहेत. दुपारनंतर हे कपडे रुग्णालयाला मिळाले.- डॉ. जयश्री मोंडकर,अधिष्ठाता, सायन रुग्णालय

टॅग्स :आरोग्यबातम्या