Join us

माणिक वर्मा यांच्यावर लय-स्वराचे संस्का : पं. सुरेश तळवलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 04:38 IST

शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माणिक वर्मा आग्रा घराण्यात शिकत असताना मी एकदा त्यांच्या तालमीला गेलो होतो. गुरूंकडून लय-स्वराचे संस्कार त्यांनी स्वतःवर कसे करून घेतले, ते पाहायला मिळाले. कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याने शिष्याचीच भूमिका ठेवायची असते. ती विनम्रता माणिक वर्मा यांच्याकडे होती, असे पं. सुरेश तळवलकर यांनी सांगितले. ज्येष्ठ गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘माणिक रत्न’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना तालयोगी प. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अशोक हांडे, माणिक वर्मा यांच्या कन्या भारती आचरेकर, वंदना गुप्ते, डॉ. अरुणा जयप्रकाश तसेच गायिका राणी वर्मा उपस्थित होत्या.

यूट्यूब वाहिनी सुरू

पुरस्कार सोहळ्यानंतर अशोक हांडे यांनी ‘माणिक मोती’ हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. वंदना गुप्ते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जन्मशताब्दीनिमित्त ‘माणिक स्वरशताब्दी’ यूट्यूब वाहिनी सुरू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

‘प्रेमाचा वारसा जपण्याचा योग आला’ 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे म्हणाल्या की, आम्ही ज्यांना फॉलो करावे, असे माणिक वर्मा यांचे व्यक्तिमत्त्व होते. माझ्या आईचे नावही माणिक असून, तिचा वाढदिवस १५ मे रोजी असतो. ती माणिक वर्मा यांच्याकडे संगीत शिकण्यासाठी कोल्हापूरमधून पुण्यात आली होती. आकाशवाणीवर त्यांची गाणी ऐकून आई गाणे शिकली. त्यामुळे या कुटुंबाशी आमचे जुने नाते आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून तोच प्रेमाचा वारसा जपण्याचा योग आला.

 

टॅग्स :पं. सुरेश तळवलकरवंदना गुप्ते