सुरेश प्रभू देणार खर्च व्यवस्थापनाचा सल्ला, मुंबईत आज जागतिक परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:57 IST2017-11-20T05:56:26+5:302017-11-20T05:57:16+5:30
मुंबई : मंदीसदृश वातावरणात कंपनीला समोर नेण्यासाठी खर्चावर मर्यादा अतिमहत्त्वाची असते.

सुरेश प्रभू देणार खर्च व्यवस्थापनाचा सल्ला, मुंबईत आज जागतिक परिषद
मुंबई : मंदीसदृश वातावरणात कंपनीला समोर नेण्यासाठी खर्चावर मर्यादा अतिमहत्त्वाची असते. अशा या खर्च व्यवस्थापनासाठी स्वत: वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू कंपन्यांना सल्ला देणार आहेत. यासंबंधीची महत्त्वाची जागतिक परिषद सोमवारी मुंबईत होणार आहे.
उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश वातावरण आहे. मागणी कमी असल्याने कंपन्यांसमोर संकट आहे. अशा स्थितीतही नफा कमविण्यासाठी खर्चावर मर्यादा असणे आवश्यक असते. यासाठी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने पुढाकार घेतला आहे. सीआयआयच्या ‘टोटल कॉस्ट मॅनेजमेंट’ (टीसीएम) विभागाकडून सोमवार, २० नोव्हेंबरला ही महत्त्वाची परिषद मुंबईत होत आहे.
‘कंपनीसमोरील अडथळ्यांचे व्यवस्थापन’ असे नाव असलेल्या या परिषदेसाठी सुरेश प्रभू मुख्य अतिथी आहेत. स्टील, कार्स, आॅटोमोबाइल, पेंट्स या क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. ‘टोटल कॉस्ट मॅनेजमेंट’ची चौकट निश्चित करण्यासाठी सीआयआय या वेळी आयआयटी बंगलोर या संस्थेशी सामंजस्य करारदेखील करणार आहे.