Join us  

‘...तर हात तोडून हातात देईन’, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना झालेल्या मारहाणीमुळे संतप्त सुप्रिया सुळेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 4:39 PM

Supriya Sule News: स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला मारहाण झाल्याचे समोर आले होते. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला मारहाण झाल्याचे समोर आले होते. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या मारहाणीविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात या मारहाणीच्या घटनेचा निषेध करताना म्हणाल्या की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्टात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावत हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत:त तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

काल बालगंधर्व सभागृह येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसराजकारण