मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी खा. सुळे यांनी ठाकरे यांना ट्रिप कशी झाली असा सवाल करत तब्येतीची विचारपूस केली.
राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पारंपरिक वेशात हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा चौक येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शविली होती. सकाळी ९:३० च्या सुमारास राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह हुतात्मा स्मारक येथे पोहोचले.
याचदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, माजी आ. विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून माघारी परतत होत्या. त्यावेळी राज आणि खा. सुळे यांची भेट झाली. तीन ते चार मिनिटे त्यांच्यात संवाद झाला.