Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:27 IST

गेल्या 9 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहिर केला आहे.

मुंबई, दि. 20 -  गेल्या 9 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहिर केला आहे. बुधवारी शिवसेना भवन येथे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव यांनी राज्यातील प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी ताईंच्या पाठिशी उभा राहील, अशी खात्री दिल्याचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले. 

उटाणे सांच्यासोबत कृती समितीचे एम.ए. पाटील, शुभा शमीम, भगवान देशमुख या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यात सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना कृती समितीच्या नेत्यांनी मांडली. मात्र सरकारविरोधात प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी कर्मचारी आणि कृती समितीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीस प्रशासनाचा नकार

‘गतवर्षीप्रमाणे मानधनवाढ हवी असेल, तर संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत,’ असा पवित्रा घेत, महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी ब्रेक लावला आहे. मात्र, चर्चेसाठी बोलावून अशा प्रकारे नेत्यांचा पाणउतारा करणा-या प्रशासनाचा निषेध व्यक्त करत, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा इशारा दिला आहे.

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात वित्त विभागाने अंगणवाडी कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याचे मुंडे यांनी सांगितले, शिवाय नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंगळवारी सचिवांच्या नेतृत्त्वाखाली बैठकीचे आयोजन केले. मात्र, मंगळवारी दुपारी बैठकीसाठी गेलेल्या कृती समितीच्या नेत्यांना उभे राहूनच संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नसल्याचे, सचिव विनिता वेद सिंघल यांनी सांगितल्याचा आरोप कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी केला आहे, ही अत्यंत वाईट पद्धत होती. त्यामुळे एकमुखाने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतल्याचेही उटाणे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कृती समितीचे नेते एम. ए. पाटील म्हणाले की, प्रशासनाने सेविकांना अवघे ९५० रुपये, मदतनिसांना ५०० रुपयांची मानधनवाढ देण्याचे आश्वासित केले आहे. मुळात ही वाढ तुटपुंजी आहे. त्यातही प्रशासनाने या आश्वासनावरही संप मागे घेतल्याशिवाय चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संप सुरूचराहील.