अणेंना समर्थन हा तर रक्तदोष - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By Admin | Updated: December 19, 2015 09:43 IST2015-12-19T09:13:29+5:302015-12-19T09:43:28+5:30
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मांडणारे श्रीहरी अणे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री व भाजपचे इतर मंत्री ठामपणे उभे राहतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे नसून हा रक्तदोष आहे,अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

अणेंना समर्थन हा तर रक्तदोष - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपा व शिवसेना यांच्यातील कुरबुरी अद्यापही कायम असून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून खवळलेल्या शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित करणारे श्रीहरी अणे व त्यांच्या पाठिशी उभे राहणा-या भाजपाच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. भाजपाने नेमलेले श्रीहरी अणे महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री व भाजपचे इतर मंत्री ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसून हा रक्तदोष आहे, अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. अखंड महाराष्ट्राचे रक्त ज्यांच्या धमन्यांतून उसळत नाही त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी विचारला आहे.
अणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभेत निदर्शने करण्यात येत आहेत. अणे यांच्या हकालपट्टीची मागणी शिवसेनेने केलेली असतानाच हे अणे यांचे वैयक्तिक मत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
अॅडव्होकेट जनरलने स्वतंत्र विदर्भाचा उघड पुरस्कार केला हे त्यांचे वैयक्तिक मत कसे काय ठरू शकते? फडणवीस मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याने ‘शेण’ खाल्ले तर तो संपूर्ण राज्याचा व सरकारचा विषय ठरेल. मंत्र्याने शेण खाल्ले हा त्याचा वैयक्तिक विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांना म्हणता येईल काय? कश्मीरात सार्वमताची भाषा करणार्या प्रशांत भूषणसारख्यांना तर सर्वोच्च न्यायालयातील चेंबरमध्ये घुसून प्रखर राष्ट्रभक्तांनी ठोकून काढले होते. हे अणे वगैरे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अर्थात मुख्यमंत्रीच त्यांच्या पाठीशी असल्याने महाराष्ट्रद्रोहाबद्दल खास ‘ब्लॅक कॅट’ कमांडोजचे संरक्षण अणे यांना मिळू शकते, पण अणे यांच्या भूमिकेस पाठिंबा देण्याचा नादानपणा जे लोक करीत आहेत त्यांना १०५ हुतात्म्यांचे तळतळाट लागून संपूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव यांनी लेखात म्हटले आहे.
अणे यांच्याविरोधात शिवसेना आमदारांनी आणलेला ‘हक्कभंग’ प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. कदाचित अखंड महाराष्ट्राचा गजर त्यांच्या कानापर्यंत पोहोचला नसावा. अणेच काय? मराठवाड्यात अत्याचार करणार्या निजामाविरोधात एखादा प्रस्ताव आणला तरी तो फेटाळून केराच्या टोपलीत फेकला गेला असता. कारण ‘निजामी अत्याचार’ हासुद्धा व्यक्तिगत विचार ठरवला गेला असता. श्रीहरींची भुरळ हरिभाऊंना पडावी व महाराष्ट्रद्रोह्यांनी बागडावे हे चांगले लक्षण नसल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीस वैयक्तिक मत असूच शकत नाही. पदावरून दूर व्हा व हवी ती मते मांडा, असे उद्धव यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची विधानसभा ही सार्वभौम आहे वगैरे ठीक हो, पण १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला हा महाराष्ट्र त्याहून सार्वभौम आहे. महाराष्ट्र आहे म्हणून आजचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष वगैरे पदे आहेत. त्यामुळे आम्ही म्हणजे शिवसेना याप्रश्नी आपला बाणा सोडणार नाही. भाजपने नेमलेले श्रीहरी अणे महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतात व मुख्यमंत्री म्हणतात, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. हे ऐकून मराठी जनता म्हणतेय, ‘कमाल झाली! खरोखरच कमाल झाली!’