सुनिता दिनकर पहिल्या महिला उपाध्यक्षा
By Admin | Updated: July 3, 2015 22:29 IST2015-07-03T22:29:08+5:302015-07-03T22:29:08+5:30
वसई-विरार महापालिकेवर एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या सुनीता दिनकर यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती

सुनिता दिनकर पहिल्या महिला उपाध्यक्षा
सुरेश लोखंडे , ठाणे
वसई-विरार महापालिकेवर एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या सुनीता दिनकर यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेवर ठाकूर यांनी अप्रत्यक्षरीत्या वर्चस्व सिद्ध केले.
शिवसेनेचे पालघर येथील आमदार व बँकेचे उपाध्यक्ष कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही निवडणूक घेण्यात आली. बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्या सहकार पॅनलचे ११ आणि बहुजन विकास आघाडीच्या लोकशाही सहकार पॅनलचे १० सदस्य होते. पण, घोडा यांच्या निधनामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलच्या संचालकांचे संख्याबळ समान झाले. नशीब बलवत्तर असलेल्या दिनकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. यापूर्वी त्यांनी जि.प. च्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषविले होते. शहापूर तालुक्यातील त्या रहिवासी आहेत. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली होती. पण, उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या पॅनलमधून निवडणूक लढवून संचालकपद मिळविले. त्यांच्या रूपाने प्रथमच बँकेला महिला उपाध्यक्षा मिळाल्या. राष्ट्रवादी-भाजपाच्या सहकार पॅनलचे भाऊ कुऱ्हाडे यांना या वेळी अपयश पत्करावे लागले. बँकेच्या २१ संचालकांपैकी घोडा यांच्या निधनामुळे दोन्ही पॅनलमध्ये समान १०-१० संचालक शिल्लक राहिले. पण, यातील एक संचालक फोडून उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु, जीवावर बेतणारी बंडखोरी टाळणेच हिताचे ठरल्याने समान मतदान होऊन चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. बँकेच्या अध्यक्षपदी असलेले राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना नशिबाच्या या खेळामुळे बँकेवर बहुमताने वर्चस्व सिद्ध करणे शक्य झाले नाही. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले खासदार कपिल पाटील यांनाही बँकेवरील ठाकूर यांचे वर्चस्व रोखता आले नाही. पण, संचालकांचे पक्षीय बलाबल लक्षात न घेता ठाकूर यांच्या वर्चस्वामुळे टीडीसीसी बँकेचे विभाजन काहीअंशी सध्यातरी लांबणीवर गेले. यामुळे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापनेचा मुहूर्त लांबला असल्याची चर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आहे.