सुनील तटकरे यांनी केली राजकीय टोलेबाजी
By Admin | Updated: June 2, 2014 04:33 IST2014-06-02T04:33:22+5:302014-06-02T04:33:22+5:30
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने दु:ख झाल्याचे सांगताना, तुम्ही राजकीय मंचावर एण्ट्री मारा, असा चिमटा मुश्ताक अंतुले यांच्याकडे पाहत रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काढला

सुनील तटकरे यांनी केली राजकीय टोलेबाजी
पनवेल : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने दु:ख झाल्याचे सांगताना, तुम्ही राजकीय मंचावर एण्ट्री मारा, असा चिमटा मुश्ताक अंतुले यांच्याकडे पाहत रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काढला. निमित्त होते रविवारी आयोजित केलेल्या पनवेल नाट्यगृहाच्या उद्घाटनाचे. आर. सी. घरत कुठे असतात तेच कळत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असल्याचा धागा पकडत, हर्षवर्धन पाटील तुम्हीही मुख्य भूमिकेत या, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. पनवेल नगरपालिकने उभारलेल्या आंद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे उद्घाटन अभिनेता प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेलच्या विकासात नाट्यगृहाच्या रूपाने भर पडली असून या माध्यमातून हा परिसर सांस्कृतिक चळवळीला चालना देण्याचे काम करीत असल्याचे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. महादेव शेलार, रयतचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, मुश्ताक अंतुले, कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा चारुशीला घरत, बांधकाम सभापती राजू सोनी, मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप आदी उपस्थित होते. आ. प्रशांत ठाकूर सभागृहात चांगले मुद्दे मांडतात. त्यांच्या माध्यमातून रायगड आणि कोकणात भरपूर विकास होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले असून नाट्यगृह बुक करण्यासाठी आॅनलाइन सेवा सुरू करण्याच्या सूचनाही सहकारमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. येथील सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार असल्याचे देवताळे म्हणाले. भविष्यात शासनाचा सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. आ. ठाकूर यांनी स्थानिक कलाकारांना नाट्यगृहाच्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. (वार्ताहर)