Join us

युती असो वा नसो, आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवावा - सुनील प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:36 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती बाबत अजून साशंकता असतांना शिवसेनेने आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती बाबत अजून साशंकता असतांना शिवसेनेने आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी 23 जानेवारीला वरळी येथे झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत आगामी निवडणूका शिवसेना स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे युती असो किंवा नसो मात्र शिवसेनेने लक्ष्य 2019 च्या अनुषंगाने शिवसेनेने मुंबईतील 12 विभागप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात शिवसैनिकांच्या मेळावा आयोजित करण्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

आगामी निवडणूकीत युती असो वा नसो मात्र शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा असे आवाहन शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार व माजी महापौर  सुनील प्रभू  यांनी काल रात्री कांदिवली येथे केले.यावेळी आमदार प्रभू यांनी शिवसैनिकांची शिवसेनाप्रमुखांवर असलेली दृढ श्रद्धेचा दाखला देत,आमची युती असो व नसो,आमचे पक्षासाठी काय काम आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले.

 विभागक्रमांक 2 चे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी चारकोप विधानसभेतील आजी माजी शिवसैनिक व गटप्रमुखांचा  मार्गदर्शन मेळावा काल रात्री  कांदिवली पश्चिम येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय एम. जी.रोड येथे आयोजित केला होता.यावेळी शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.यावेळी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खासदार अरविंद सावंत यांनी 25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ठाकरे सिनेमाचा दाखला देत शिवसेनाप्रमुखांनी कठीण काळात त्यांनी शिवसेना कशी जोमाने उभी केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे कशा प्रकारे हिंदुत्व अस्मितेचे मुद्दे घेऊन पक्ष वाढीचे कसे काम करत आहेत.अशावेळी सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुखांच्या भूमिका आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेली अनेक कामे जनतेसमोर प्रभावीपणे मांडावीत असे आवाहन त्यांनी केले.

सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी चारकोप विधानसभा संघटक संतोष राणे,उपविभागप्रमुख विजय भोसले व राजू खान,महिला उपविभाग संघटक अपर्णा मोहिते व आकांक्षा नागम,शाखाप्रमुख मनोज मोहिते,श्याम मोरे व निखिल गुढेकर,राजेंद्र निकम आणि शिवसैनिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :शिवसेनामुंबईसुनील प्रभू