एनसीबीचे अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:15 IST2021-01-08T04:15:13+5:302021-01-08T04:15:13+5:30
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याच्याबरोबर त्याची बहीण कोमल ...

एनसीबीचे अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याच्याबरोबर त्याची बहीण कोमल रामपालही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) तिला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले आहे. बुधवारी तिला कार्यालयात पाचारण करण्यात आले होते, मात्र ती चौकशीसाठी आली नाही, त्यामुळे तिला पुन्हा बोलाविण्यात आले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
एनसीबीने दोन महिन्यांपूर्वी अर्जुन रामपाल याच्या वांद्रे येथील घरावर छापे टाकले. तेव्हापासून त्याची व त्याची गर्लफ्रेंड एंजेलिनाकडे अनेकवेळा चौकशी करण्यात आली, तर एंजेलिनाचा भाऊ गँबरीएल याला अटक केली आहे. अर्जुनच्या घरी सापडलेल्या बंदी असलेल्या औषधांबाबत त्याने आणि त्याचा डॉक्टरने दिलेल्या जबाबमध्ये विसंगती आढळून येत आहे. त्यामुळे त्याला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. एनसीबीच्या तपासात त्याची बहीण कोमल रामपाल हिचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले आहे. तिच्या जबाबातून महत्त्वपूर्ण बाबी उघडकीस येण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.